अकोला–खंडवा गेज परिवर्तन प्रकल्पांतर्गत महत्त्वाची कामगिरी;तापी नदीवरील महत्त्वाच्या पुल क्रमांक 627/1 चे यशस्वी गर्डर लाँचिंग

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 17/02/2026 5:45 PM

 अकोला–खंडवा गेज परिवर्तन (GC) प्रकल्पांतर्गत एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. अमलाखुर्द–टुकाईथाड विभागात तापी नदीवरील महत्त्वाच्या पुल क्रमांक 627/1 च्या सुपरस्टक्चरचे यशस्वी लाँचिंग करण्यात आले आहे.

या पुलात 4 × 76.2 मीटर RDSO मानक ओपन वेब गर्डर्स (OWG) आहेत. फेब्रुवारी महिन्यात प्रगत लाँचिंग नोज पद्धतीचा वापर करून हे गर्डर्स यशस्वीरीत्या बसविण्यात आले. तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेले हे काम अत्यंत अचूक नियोजन व काळजीपूर्वक अंमलबजावणीद्वारे पूर्ण करण्यात आले असून, प्रकल्पाच्या प्रगतीस मोठी चालना मिळाली आहे.

अमलाखुर्द–टुकाईथाड विभाग (12 कि.मी.) हा व्यापक अकोला–खंडवा गेज परिवर्तन प्रकल्पाचा भाग असून, तो EPC (Engineering, Procurement and Construction) करारांतर्गत राबविण्यात येत आहे. तापी नदीवरील गर्डर लाँचिंग यशस्वी झाल्याने या विभागाच्या पूर्णतेकडे एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

लाँचिंग नोज पद्धतीमुळे नदीपलीकडे गर्डर्स सुरक्षित व कार्यक्षमरीत्या बसविता आले आणि RDSO मानके तसेच सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. ही कामगिरी अभियंते व प्रकल्प पथकांच्या समर्पणाचे, तांत्रिक कौशल्याचे आणि समन्वयित कार्याचे उत्तम उदाहरण आहे.

या यशाबद्दल अभिनंदन व्यक्त करताना प्रदीप कामले, मंडळ रेल्वे व्यवस्थापक, नांदेड म्हणाले:

> “तापी नदीवरील ओपन वेब गर्डर्सचे यशस्वी लाँचिंग हे अकोला–खंडवा गेज परिवर्तन प्रकल्पातील एक महत्त्वाचे अभियांत्रिकी यश आहे. या कार्यात सहभागी सर्व अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांचे सूक्ष्म नियोजन, तांत्रिक उत्कृष्टता आणि बांधिलकीबद्दल मी अभिनंदन करतो. या यशामुळे रेल्वे संपर्क अधिक बळकट होईल आणि प्रादेशिक विकासाला गती मिळेल.”



अकोला–खंडवा गेज परिवर्तन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रादेशिक संपर्कात लक्षणीय सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि परिसराच्या सामाजिक-आर्थिक विकासाला महत्त्वपूर्ण हातभार लागेल.

Share

Other News

ताज्या बातम्या