नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
चे घटक व त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे उपक्रम” या विषयावरील
कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. नितीन करमळकर यांनी राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण २०२० विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे
प्रतिपादन केले.
ते म्हणाले की, गेल्या ७०–७५ वर्षांत
अभ्यासक्रमात फारसा बदल झाला नव्हता; मात्र नव्या शैक्षणिक धोरणात
शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम, कौशल्यविकास
आणि सामाजिक भान या सर्व बाबींचा सखोल विचार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना केवळ
पदवीपर्यंत मर्यादित न ठेवता त्यांच्या सामाजिक, बौद्धिक आणि
व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हेच या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. देशातील सुमारे
२० टक्के विद्यार्थी केंद्रीय विद्यापीठांमध्ये तर ८० टक्के विद्यार्थी राज्य विद्यापीठांमध्ये
शिक्षण घेत असल्यामुळे या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी राज्य विद्यापीठांमधून होणे अत्यंत
गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सर्वगुणसंपन्न पिढी घडविण्याचा
प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते.
अध्यक्षीय समारोपात त्यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे हे विद्यापीठांचे प्रमुख
ध्येय असून मराठवाड्यातील विद्यार्थी अत्यंत गुणवंत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन
मिळावे यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार,
आयक्यूएसी संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, व्यवस्थापन
परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. सूर्यकांत जोगदंड,
डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, डॉ. संतराम मुंडे, डॉ. संगीता माकोने आदी मान्यवरांची
प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी केली, तर सूत्रसंचालन आंतरविद्याशाखेचे
अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांनी केले.