माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय,अंबुलगा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट;परीक्षेतील अनियमिततेप्रकरणी कारणे दाखवा नोटीस

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 16/02/2026 4:25 PM

नांदेड :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज भौतिकशास्त्र विषयाचा पेपर पार पडला. यानिमित्त जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील माणिक प्रभु उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्राला अचानक भेट.
  भेटीदरम्यान उरलेल्या प्रश्नपत्रिका मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरक्षितरित्या जमा न केल्याची गंभीर त्रुटी आढळून आली. तसेच परीक्षेचे पर्यवेक्षण करणाऱ्या काही शिक्षकांनी आपले ओळखपत्र जवळ न ठेवल्याची बाबही निदर्शनास आली. या अनियमिततेसंदर्भात संबंधित केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.                   याशिवाय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक ड्युअल डेस्कची व्यवस्था नसल्याचेही आढळून आले. ही बाब अत्यंत गंभीर असून, संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिल्या आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्र रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अनेक संवेदनशील केंद्रांवर बैठे पथकांमार्फत निगराणी ठेवण्यात येत आहे. झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे थेट नियंत्रण करण्यात येत असून त्यासाठी दोन स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. इयत्ता 12 वी व 10 वीच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी सीसीटीव्ही व ड्रोनच्या माध्यमातूनही चित्रीकरण करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या