नांदेड : राज्याचे मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या १५० दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हा प्रशासनाने नागरिकाभिमुख व अभिनव असा ‘ई-टपालवाला सेवा’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांच्या अर्जावर केलेल्या कार्यवाहीची माहिती थेट त्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
या सेवेमुळे नागरिकांना कार्यवाही बाबतची माहिती मिळविण्यासाठी कार्यालयात वारंवार येण्याची गरज राहणार नाही. नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज अथवा पत्र सादर करताना त्यामध्ये स्वतःचा व्हॉट्सअॅप क्रमांक नमूद करावा.यामुळे अर्जदारास त्यांनी मागितलेली माहिती घरबसल्या त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात प्रथमच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, केवळ मागील दोन दिवसांत १ हजार ५०० नागरिकांना या ई-टपालवाला सेवेद्वारे माहिती देण्यात आली आहे. तसेच आगामी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी नेमणूक करण्यात आलेल्या ५७७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांचे आदेश या ई-टपालवाला सेवेद्वारे थेट त्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात आले आहेत.
लोकाभिमुख, पारदर्शक, जलद व कार्यक्षम प्रशासन देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, अधिकाधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
ही सेवा यशस्वीपणे कार्यान्वित करण्यासाठी आयटी कन्सल्टंट संतोष निलावार व मुख्यमंत्री फेलो आर्थव मोडक यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.