जनगणना कामासाठी अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 05/01/2026 5:28 PM

नांदेड : जनगणना कामासाठी अचूक व विश्वासार्ह माहिती संकलन होणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी योग्य नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जनगणना २०२७ च्या पूर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेत बोलत होते.

सन २०२७ मध्ये होणारी राष्ट्रीय जनगणना ही पहिल्यांदाच पूर्णतः डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून, अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती संकलन केले जाणार आहे. यासाठी मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर करण्यात येणार असून, संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय पोर्टल कार्यान्वित राहणार आहे.

अचूक लोकसंख्येची आकडेवारी प्राप्त होण्यासाठी जनगणना प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गट नियोजन, पर्यवेक्षक व प्रगणक यांच्या नियुक्तीबाबत योग्य नियोजन करावे. तसेच जनगणना प्रक्रियेतील प्रत्येक तरतूद सखोलपणे समजून घेऊन अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले.

सन २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणना प्रक्रियेच्या प्रशासकीय तयारीला प्रारंभ झाला असून, त्याअनुषंगाने जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणालाही सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र जनगणना संचालनालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे ही पूर्वतयारी कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेत जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक प्रविण भगत व अरुण साळगांवकर यांनी संगणकीय सादरीकरण तसेच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सुलभ पद्धतीने प्रशिक्षण दिले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, तहसीलदार विपीन पाटील, सर्व तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, नगररचना कार्यालयातील अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

जनगणनेचे काम अत्यंत महत्त्वाचे असून यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय अथवा निष्काळजीपणा केल्यास कठोर शिक्षेस पात्र ठरावे लागेल. त्यामुळे जनगणना कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण व आढावा बैठकीस उपस्थित राहून प्रत्यक्ष सोपविण्यात आलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडणे आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी सूचित केले.

Share

Other News

ताज्या बातम्या