जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचा संवेदनशील समन्वय, ब्रेनडेड रुग्णाच्या अवयवदानातून तिघांना मिळाले जीवनदान...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/12/2025 9:53 PM

- हरिपूरचे दीपक धर्माधिकारी मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत राहणार

 सांगली, दि. १९,
मृत्यू हे अंतिम सत्य आहे असे मानले जाते. पण, वैज्ञानिक क्रांतीमुळे मरावे परी अवयवरूपी उरावे, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय सांगलीत आला. कुटुंबियांच्या संवेदनशील निर्णयामुळे दिवंगत दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे यकृत व मूत्रपिंड नाशिक येथील दोन व सांगली येथील एक अशा एकूण तीन रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेच्या संवेदनशील व तत्पर समन्वयातून यकृत अवघ्या २५ मिनिटात कोल्हापूरला आणि तिथून विशेष विमानाने अवघ्या दीड तासात नाशिकला पोहोचले तर मूत्रपिंड ग्रीन कॉरिडॉरद्वारे रूग्णवाहिकेतून नाशिकला रवाना झाले. 
सांगलीतील हरिपूर येथील रहिवासी, ६९ वर्षीय दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मेंदूमध्ये झालेल्या तीव्र रक्तस्त्रावामुळे मंगळवारी, दि.१६ डिसेंबर रोजी उषःकाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांचा मेंदू मृत झाल्याचे स्पष्ट झाले. अशा दुःखद क्षणीही त्यांच्या कुटुंबियांनी स्वतःच्या दुःखावेगाला आवर घालत अवयवदानाचा घेतलेला निर्णय मानवतेला उंचावणारा ठरला. पत्नी दीपा, कन्या डॉ. श्रेया आणि चिरंजीव अभिनंदन धर्माधिकारी यांनी इतर कुटुंबियांच्या सहमतीने अवयवदानाचा निर्णय घेत, दीपक धर्माधिकारी यांना मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत ठेवण्याचा मार्ग निवडला. त्यानुसार दिवंगत दीपक धर्माधिकारी यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, दोन डोळे आणि त्वचा दान करण्यात आली. या निर्णयाची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांना रूग्णालय प्रशासनाने दिली.
अवयवदानाच्या प्रक्रियेत वेळ खूप महत्त्वाचा असतो. हे लक्षात घेऊन रूग्णालय प्रशासनाच्या विनंतीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी तत्परतेने आवश्यक परवानग्या, सुरक्षा व्यवस्था व वाहतूक नियोजनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत आवश्यक प्रशासकीय पाठबळ दिले. 
यासंदर्भात दीपक धर्माधिकारी यांना श्रद्धांजली वाहून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मानवता एक आहे, आपल्यात कसलाही भेद नाही, अवयवदानाने आपल्या व्यक्तिंना अजरामर करावे. मृत्युनंतरही मृत व्यक्ति कुठल्या तरी व्यक्तिमध्ये अवयवाच्या रूपाने जिवंत राहणार आहे आणि त्याचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभणार आहेत, असे सांगून त्यांनी दीपक धर्माधिकारी यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, दोन डोळे आणि त्वचा या अवयवांचे दान करण्याचा निर्णय अवयवदानाच्या चळवळीला बळ देणारा आहे. यामुळे अवयवदानाबद्दल समाजात अधिक जनजागृती होईल, असा विश्वास व्यक्त केला. 
नाशिक येथील अशोका मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टराची टीम शुक्रवारी सकाळी सांगलीला दाखल झाली. त्यांनी जवळपास दोन तासात संबंधिताचे अवयव सुस्थितीत काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर या रूग्णालयातून नाशिक येथे पोहोचवण्यासाठी यकृत नेण्यासाठी विशेष विमान व मूत्रपिंड पाठवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. ग्रीन कॉरिडॉरमुळे सांगलीतून रूग्णवाहिकेने अवघ्या २५ मिनिटात कोल्हापुरात आणि तेथून विशेष विमानाने अवघ्या दीड तासात यकृत नाशिकला नेण्यात आले. ग्रीन कॉरिडॉरमुळे अवयवदानातील यकृत व मूत्रपिंड नाशिक येथील रुग्णालयात विनाअडथळा व गतीने नेण्यासाठी मोठी मदत झाली. दिवंगत दीपक धर्माधिकारी यांच्या दुसऱ्या मूत्रपिंडाचे उषःकाल रूग्णालयातीलच दुसऱ्या एका रूग्णास प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच, डोळ्यांचा कॉर्निया अनुराधा आय हॉस्पिटल आणि त्वचा सुश्रुत प्लास्टीक सर्जरी हॉस्पिटल येथे नेण्यात आले असून आवश्यकतेनुसार प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. 
 या महत्त्वपूर्ण आणि जीवनदायी ठरणाऱ्या उपक्रमात उषःकाल रूग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद पारीख, डॉ. मकरंद खोचीकर, डॉ. आनंद मालाणी, डॉ. बिपीन मुंजाप्पा यांच्यासह वैद्यकीय पथकाच्या अचूक व वेगवान समन्वयाने हे काम तांत्रिकदृष्ट्या यशस्वी झाले. दोन व्यक्तिंना जीवनदान देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल उषःकाल रूग्णालय व्यवस्थापनाने जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे आभार व्यक्त केले. 
दिवंगत दीपक धर्माधिकारी यांचे आयुष्य जरी संपले असले तरी त्यांच्या अवयवदानामुळे दोन जीवांना नवे आयुष्य लाभले. ही घटना समाजाला मानवतेचा खरा अर्थ शिकवणारी ठरली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या