नांदेड :- जिल्ह्यातील माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पशुप्रदर्शन स्पर्धेत मराठवाड्याचे भूषण मानल्या जाणाऱ्या देवणी जातीच्या वळूंनी बाजी
मारली आहे . लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील उजळंब येथील शेतकरी विनायक श्रीमंतराव थोरात यांच्या देवणी जातीच्या वळूंनी या स्पर्धेत बाजी मारली.
या स्पर्धेत एक वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक तसेच एक वर्षावरील गटात द्वितीय क्रमांक असे दोन्ही पारितोषिके विनायक थोरात यांच्या देवणी जातीच्या वळूंनी पटकावून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. देवणी जातीची वैशिष्ट्ये, उत्तम बांधा, चांगले आरोग्य व शुद्ध वंश या गुणांच्या आधारे परीक्षकांनी या वळूंना विशेष गुण दिले.
या यशामुळे देवणी जातीच्या गोवंश संवर्धनाला चालना मिळाली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माळेगाव यात्रेतील या पशुप्रदर्शन स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील देशी गोवंशाच्या जतन व संवर्धनाला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या यशाबद्दल शेतकरी विनायक श्रीमंतराव थोरात यांनी यासाठी घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचे पशुपालक, ग्रामस्थ तसेच शेतकरी बांधवांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
मालेगाव यात्रा ही नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात खंडोबा देवाची मोठी यात्रा असते जी दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला भरते आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते.
शेतकरी विनायक श्रीमंतराव थोरात
वळूची काळजी लहान मुलांप्रमाणे घ्यावी लागते.
दररोज दोन वेळा शेंगदाण्याची पेंड भिजवून द्यावी लागते. तसेच मका, ज्वारी-बाजरीचा भरडा, पौष्टिक खुराक आणि हिरवा चारा खाऊ घालावा लागतो.
रोज सकाळी व संध्याकाळी योग्य असा व्यायाम करून घ्यावा लागतो आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागते. दररोज शाम्पू व साबणाने नीट स्वच्छ करून घ्यावे लागते.