नांदेड :- माळेगाव यात्रेत भाविकांसाठी शुध्द, पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली तसेच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाणीपुरवठा व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
लिंबोटी जलाशयामध्ये बसविण्यात आलेल्या 120 एचपी क्षमतेच्या व्हर्टिकल टर्बाईन पंपाद्वारे तसेच लिंबोटी जलशुद्धीकरण केंद्रातील 100 एचपी क्षमतेच्या सेंट्रीफ्युगल पंपाद्वारे पाणी उचलण्यात येत आहे. या पाण्यावर तुरटी, ब्लीचिंग पावडर, फिल्टर मिडिया यांचा वापर करून शुद्धीकरण केले जात आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत नियमित ओटी टेस्ट घेऊन पाणी पिण्यास योग्य असल्याची खातरजमा केल्यानंतरच यात्रेसाठी पाणीपुरवठा केला जात आहे.
माळेगाव यात्रेसाठी जिल्हा परिषद लातूरकडून 3 टँकर, सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोलीकडून 2 टँकर, गुरुद्वारा लंगर साहिबकडून 2 टँकर तसेच नांदेड महानगरपालिकेकडून 1 टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. दररोज सकाळी 5 वाजल्यापासून 8 टँकरद्वारे सर्व हॉटेल्स व व्यापाऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
तसेच घोडा लाईन, उंट लाईन, गाढव लाईन, तमाशा मंडळ, आकाश पाळणे, मंदिर गल्ली, पोलीस कॅम्प आदी ठिकाणी नियमितपणे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दोन बसस्थानकांवर प्रत्येकी एक टँकर तैनात ठेवण्यात आला असून, एक टँकर अतिरिक्त राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांच्या ठिकाणीही दिवसभर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.