श्री खंडोबा मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी अखंड अन्नदान

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/12/2025 7:17 PM

नांदेड :- माळेगाव येथे दरवर्षी भरणाऱ्या श्री खंडोबा यात्रेनिमित्त देशातील विविध राज्यांतून लाखो भाविक श्री खंडोबाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. या भाविकांसाठी श्री खंडोबा मंदिर ट्रस्टच्या वतीने यात्रेच्या कालावधीत दहा दिवस अखंड अन्नदान करण्यात येत असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद वसंतराव पाटील व सचिव आर. एम. कनकदंडे यांनी दिली.
      दररोज सकाळी पाच ते सहा या वेळेत अभिषेक संपन्न होतो. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात येते. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये वरण, भात, भाजी, पोळी व एक गोड पदार्थ दिला जातो. सायंकाळी सहानंतर खिचडी, मुरमुरे किंवा इतर प्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात येते.
       गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर ट्रस्टच्या वतीने ही अन्नदान सेवा अखंडपणे सुरू आहे. यात्रेच्या कालावधीत स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला असून, भाविकांसाठी हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने संपूर्ण यात्रा कालावधीत सुमारे 100 क्विंटल अन्न शिजवले जाते.
      मंदिरातील पुजाऱ्यांच्या माध्यमातून भाविकांना सुरळीत देवदर्शन घडवून आणले जात असून, दररोज साठ ते सत्तरहजारांहून अधिक भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या