गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर उपमहापौर गजानन मगदूम यांच्या सूचनांनंतर मनपा अॅक्टिव, सुविधांच्या कामांना वेग

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/09/2026 1:58 AM

कुपवाड : येत्या 14 सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड शहरात गणेशोत्सव काळात नागरिक व गणेश मंडळांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विविध सुविधांच्या कामांना वेग देण्यात आला आहे. सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपमहापौर गजानन मगदूम यांनी महापालिका प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर शहरातील विविध कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
गणेशोत्सव शांततेत, उत्साहात व कोणत्याही अडचणीशिवाय साजरा व्हावा, यासाठी उपमहापौर गजानन मगदूम यांनी यापूर्वी कुपवाड शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत मंडळांना येणाऱ्या अडचणी व आवश्यक सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या.
शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरातील गणेश मंडळांच्या परिसरात जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर पॅचवर्क करून रस्ते सुस्थितीत करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात आले असून परिसरातील कचरा साफसफाई, स्वच्छता मोहीम तसेच औषध फवारणीची कामे सुरू करण्यात आली आहेत.
गणेश विसर्जनाच्या काळात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विसर्जन व्यवस्था, विसर्जन विहिरींची स्वच्छता व आवश्यक सुविधांची कामे देखील सुरू करण्यात आली आहेत.
गणेशोत्सव हा कुपवाड शहरातील नागरिकांचा उत्सव असल्याने तो आनंदात व सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा, तसेच गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा-संबंधित अडचणी येऊ नयेत, यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने कामे पूर्ण करावीत, अशा सूचना उपमहापौर गजानन मगदूम यांनी दिल्या आहेत.
यावेळी सहाय्यक आयुक्त श्वेता सुर्वे नगर अभियंता महेश मदने स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे गणेश धोतरे हणमंत सरगर अजिंक्य हजारे उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या