नांदेड : रेशीम दिनानिमित्त जिल्हा रेशीम कार्यालयांच्या वतीने लोहा तालुक्यातील मौजे सायाळ येथे रेशीम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील प्रगतीशील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय स्टेट बँकेच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या (एसबीआय-आरसेटी) वतीने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी आयोजित दहा दिवसीय मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी लोहा तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी रेशीम शेतीच्या माध्यमातून एकरी दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत. या शेतकऱ्यांच्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेऊन रेशीम शेतीचा अवलंब केल्यास पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळण्याबरोबरच उत्पन्नाची शाश्वतीही प्राप्त होऊ शकते, असे सांगितले.
सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने पारंपरिक पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत रेशीम शेती ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्यायी शेती पद्धत ठरत असून उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण करण्यास उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन श्री. वडवळे यांनी केले.
रेशीम शेतीला व्यवसायाची जोड देऊन शेतकऱ्यांमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने एसबीआय-आरसेटीच्या वतीने दहा दिवसीय मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना व्यवसाय व्यवस्थापन, उद्योजकता आणि संबंधित विविध बाबींचे मार्गदर्शन मिळणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे, एसबीआय-आरसेटीचे संचालक कैलास जायभाये, आशिष राऊत, जिल्हा रेशीम कार्यालयाच्या कांचन जाधव व अभय कुलकर्णी, तसेच प्रगतिशील शेतकरी रत्नाकर ढगे यांच्यासह रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी माधव जायभाये, भारत राऊत, लक्ष्मण दळवे, किरण शिखरे, गंगाधर पावडे आणि कल्याण पाटील या प्रगतिशील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.