महापालिकेत शहर टास्क फोर्स कमिटीची बैठक संपन्न;पल्स पोलिओ मोहीम व अतिसार नियंत्रण पंधरवडा संदर्भात महापौर व आयुक्तांनी घेतला संयुक्त आढावा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/06/2026 7:56 PM

नांदेड : 'शून्य बालमृत्यूचे ध्येय आणि पोलिओमुक्त भारताचा संकल्प' सुरक्षित ठेवण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रात आगामी रविवार, २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 'स्टॉप डायरिया कॅम्पेन' (अतिसार नियंत्रण पंधरवडा) शहरात प्रभावीपणे राबवण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या शहर कार्य बल गटाची (City Task Force) विशेष आढावा बैठक दि.२३.०६.२०२६ रोजी मनपा स्थायी समिती बैठक कक्षात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत *महापौर सौ.कविता संतोष मुळे* आणि *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला व अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

पल्स पोलिओ मोहिम संबंध देशभरासह नांदेड शहरात सुध्दा आगामी २८ जून रोजी राबवली जाणार असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक लस घेण्यापासून दुर्लक्षित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत नांदेड मनपा क्षेत्रातील ० ते ५ वर्षांखालील ९२,८४५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात असुन या मोहिमेसाठी शहरात एकुण २८५ पोलिओ बुथ निश्चित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रवासात असलेल्या किंवा दुर्गम भागात राहणाऱ्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी एकुण ६३ विशेष ट्रान्झिट पथके सज्ज करण्यात आली आहेत. मोहिमेच्या पहिल्या दिवशी (२८ जून) जे बालक बूथवर येऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी पुढील काही दिवस घरोघरी भेट देऊन एकुण १८० IPPI टीम मधील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन वंचित बालकांना पोलिओचे थेंब पाजतील. त्याचप्रमाणे शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक, बाजारपेठा, मुख्य चौक येथे लसीकरण करण्यासाठी एकुण १३ मोबाईल टीम स्थापित केल्या जाणार आहेत.

त्याचप्रमाणे स्टॉप डायरिया कॅम्पेन (अतिसार नियंत्रण) मोहिमे अंतर्गत बालकांमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊन होणारे मृत्यू रोखण्यासाठी शहरात अतिसार नियंत्रण पंधरवडा प्रभावीपणे राबवला जाईल. या मोहिमेत आशा स्वयंसेविकांमार्फत ५ वर्षांखालील मुलांच्या घराघरांमध्ये ओआरएस (ORS) पाकिटे आणि झिंक गोळ्यांचे पूर्व-नियोजित वाटप केले जाईल. शहरातील झोपडपट्ट्या, हाय-रिस्क एरिया, बांधकाम साईट्स आणि स्थलांतरित नागरिकांच्या वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून मायक्रो प्लॅन तयार करण्यात आला आहे. मनपाच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांवर, रुग्णालयांमध्ये आणि ओपीडी मध्ये 'ओआरएस-झिंक कॉर्नर्स' सुरू करण्यात येतील. तसेच शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि हात धुण्याच्या योग्य सवयींबाबत शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे.

*महापौर व आयुक्तांचे आवाहन:*
बैठकीत बोलताना महापौर सौ.कविता संतोष मुळे यांनी सांगितले की, पोलिओ निर्मूलनाचे यश टिकवून ठेवण्यासाठी शहरातील एकाही बालक लसीकरणापासून दुर्लक्षित राहू नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी. मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी स्पष्ट केले की, मुलाने नियमित लसीकरणातील सर्व पोलिओ डोस घेतले असले, तरीही या राष्ट्रीय मोहिमेतील अतिरिक्त डोस देणे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि पालकांनी २८ जून रोजी आपल्या ५ वर्षांखालील प्रत्येक बालकाला आपल्या जवळच्या केंद्रात नेऊन पोलिओ डोस नक्की पाजावा आणि अतिसार नियंत्रण मोहिमेला सहकार्य करून आपले शहर बालमृत्यूमुक्त व सुदृढ बनवण्यास मदत करावी.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत रिठ्ठे, सर्व वैद्यकीय अधिकारी, शिक्षणधिकारी प्रविणा मांदळे, आरोग्य निरीक्षक आणि टास्क फोर्स कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या