आंतरराष्ट्रीय योग दिन भगूर मध्ये उत्साहात साजरा
भगूर शहरात जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या उपक्रमात नगराध्यक्षा, नगरसेवक, महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाचे महत्त्व जाणून घेतले आणि निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.
शिक्षण मंडळ भगूर संचलित श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवळाली कॅम्प येथे दि. २१ जून २०२६ रोजी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या "योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ" या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, प्राणायाम तसेच विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी योगाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, " *योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहते, मन प्रसन्न राहते तसेच तणावमुक्त आणि संतुलित जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश केल्यास व्यक्तिमत्त्व विकासासह मानसिक एकाग्रता वाढण्यास मदत होते.* "
या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. तुषार तेलोरे, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा. अश्विनी ठाकरे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळाने विशेष परिश्रम घेतले. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची प्रभावी जीवनशैली आहे, हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.