नांदेड :- नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्ड (SSC Board) परीक्षेच्या निकालात दैदीप्यमान यश संपादन केलेल्या 'चाटे कोचिंग क्लासेस'च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ 'गौरव गुणवंतांचा, सोहळा आनंदाचा' हा विशेष सत्कार सोहळा कुसुम सभागृह येथे अत्यंत उत्साहात आणि भारावलेल्या वातावरणात संपन्न झाला.
या निकालामध्ये टोम्पे स्नेहल संदीपराव व पवार समृद्धी विलासराव या दोन विद्यार्थिनीने 100 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला तर रागिनी सुशांत पांडे हिने 99.60 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाचा बहुमान पटकाविला.यासोबतच एकूण 137 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण तर 202 विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून चाटे क्लासेसला यशाच्या शिखरावर पोहोचविले.संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळविणारे 17 विद्यार्थी, गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळविणारे 15 विद्यार्थी, विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळविणारे 02 विद्यार्थी व सामाजिक शास्त्र विषयात 07 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवून चाटे क्लासेसच्या यशाची अखंड परंपरा कायम राखली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रा. गोपीचंद चाटे यांनी भूषवले. व्यासपीठावर संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सभागृह यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या अभिमानाने भरलेल्या पालकांच्या उपस्थितीने तुडुंब भरले होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. गोपीचंद चाटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच त्यांना मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, "केवळ गुण मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर मिळालेल्या ज्ञानाचा वापर समाजाच्या आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी करणे हीच खरी विद्यार्थ्यांची ओळख आहे. चाटे क्लासेसने नेहमीच गुणवत्तेला आणि शिस्तीला प्राधान्य दिले असून, आजचे हे यश शिक्षकांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांच्या चिकाटीचे फळ आहे." त्यांनी पालकांनाही आवाहन केले की, पाल्यांच्या आवडीनुसार त्यांना करियर निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे.कार्यक्रमादरम्यान, प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. आपल्या यशाचे श्रेय देताना अनेक विद्यार्थ्यांनी चाटे क्लासेसची कार्यप्रणाली मांडताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी घेतलेले परिश्रम,विद्यार्थ्यांना केलेले पर्सनल गाईडन्स,अभ्यासक्रमावर वर्षभर घेतलेल्या युनिट टेस्ट व सराव परीक्षा,पेपरचे केलेले मूल्यमापन, Personal Doubt Session आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्यवस्थापनाचे प्रत्येक विद्यार्थ्यावर असणारे वैयक्तिक लक्ष या सगळ्या गोष्टी बोर्ड परीक्षेसाठी किती महत्वाच्या ठरतात,याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी चाटे क्लासेसच्या नांदेडमधील स्टेडियम रोड, पूर्णा रोड आणि चैतन्यनगर या तिन्ही शाखांच्या व्यवस्थापन व शिक्षक वृंदाने विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नेहरकर सर तर प्रास्ताविक नांदेड शाखेचे शाखा व्यवस्थापक मा.प्रा.सचिन घुगे सर यांनी केले.या सोहळ्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, पुढील उच्च शिक्षणाच्या प्रवासासाठी त्यांना एक नवी उमेद मिळाली आहे.