जनगणनेची अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/04/2026 7:22 PM

नांदेड :– जनगणना फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भारताची जनगणना ही देशातील 16 वी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे.

ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणारी पहिलीच जनगणना असून ती अधिक अचूक, वेगवान आणि पर्यावरणपूरक असेल. यामध्ये प्रथमच सामान्य नागरिकांना पोर्टलद्वारे स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जनगणना ही भारतीय संविधानात नमूद केलेली अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून लोकशाहीचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी तिची भूमिका महत्त्वाची आहे. जनगणनेद्वारे गोळा होणारी माहिती ही राष्ट्रनिर्मितीचा आधार असून यावरच विकास योजना, धोरणनिर्मिती, कल्याणकारी योजना आणि पायाभूत सुविधांचे नियोजन ठरवले जाते.

त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मे आणि जून २०२६ या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री कर्डीले यांनी केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, महानगरपालिकेचे उपायुक्त अभिजित वायकोस, सहाय्यक आयुक्त श्रीमती मनीषा नरसाळे, तसेच जनगणना संपर्क अधिकारी नेहाल धुरंधरे उपस्थित होते.

प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून संजय सोळंकर, गिरीश सर्कलवाड आणि संघरत्न सोनसळे हे मार्गदर्शन करणार आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या