दिव्यांग लाभार्थ्यांनी 25 मार्चपर्यंत युडीआयडी कार्ड सादर करावे - तहसीलदार संजय वारकड

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/03/2026 7:14 PM

 नांदेड :- संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या नांदेड तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले दिव्यांग प्रमाणपत्र (UDID कार्ड) 25 मार्च 2026 पर्यंत तहसील कार्यालयात सादर करावे, असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे. 

निर्धारित कालावधीत कागदपत्रे सादर न केल्यास अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड तालुक्यात सध्या या योजनेअंतर्गत एकूण 1 हजार 207 दिव्यांग लाभार्थी लाभ घेत असून त्यांना शासनाकडून दरमहा 2 हजार 500 रुपये अनुदान दिले जाते. मात्र, प्रशासकीय नोंदीनुसार यापैकी 833 लाभार्थ्यांनी अद्याप ‘युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी कार्ड’ (UDID) तहसील कार्यालयात जमा केलेले नाही.

लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कागदपत्रे जमा करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड व आधार कार्डची झेरॉक्स आपल्या गावातील तलाठी यांच्याकडे जमा करावी किंवा थेट तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात सादर करावी. यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

शासनाच्या नियमानुसार लाभार्थ्यांची पडताळणी करणे आवश्यक असल्याने दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड व आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत, जेणेकरून अनुदानाचा लाभ विनाव्यत्यय सुरू राहील, असेही तहसीलदार संजय वारकड यांनी सांगितले.

Share

Other News

ताज्या बातम्या