शेटे वरिष्ठ महाविद्यालयात "निर्भय कन्या अभियान "कार्यशाळा उत्साहात संपन्न*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 13/02/2026 9:32 PM

*श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात "निर्भय कन्या अभियान "कार्यशाळा उत्साहात संपन्न* . या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थिनींमध्ये कायदेशीर हक्कांविषयी  जागरूकता निर्माण करणे, आरोग्य विषय जागरूकता आणि व स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करणे आत्मविश्वास वाढवणे हा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृत्युंजय कापसे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अश्विनी ठाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना निर्भय कन्या अभियान हे केवळ अभियान नसून मुलींना निर्भय ,सजग आणि सक्षम बनविण्याचा एक प्रभावी उपक्रम आहे असे सांगितले. प्रा.प्राजक्ता जोशी यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
      आरोग्य विषयक मार्गदर्शनासाठी लाभलेल्या डॉ. हेमांगीताई पाटील यांनी सांगितले की, "आरोग्य हीच खरी संपत्ती आहे मुलींनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे किशोर वयात शरीरात होणारे बदल समजून घेणे आणि त्याबाबत लाज न बाळगता योग्य माहिती मिळवणे गरजेचे आहे तसेच त्यांनी लोहयुक्त आहार दूध व प्रथिनेयुक्त पदार्थ यांचे महत्त्व देखील स्पष्ट केले. ॲनिमिया टाळण्यासाठी नियमित हिमोग्लोबिन तपासणी करण्याचा सल्ला दिला.                कायदेविषयक मार्गदर्शनासाठी लाभलेल्या ॲड.मीनल भोसले यांनी मुलींसोबत बोलताना त्यांच्या 
         कायदेशीर हक्कांची सखोल माहिती तक्रार प्रक्रियेचे मार्गदर्शन व अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभ्या राहून सशक्त नागरिक कशा पद्धतीने बनता येईल या संबंधित सविस्तर मार्गदर्शन केले. 
      स्वसंरक्षण विषयक  मार्गदर्शनासाठी निर्भया पथकातील अनुराधा दिघे यांनी विद्यार्थिनींना  सुरक्षा ही आपली पहिली जबाबदारी आहे असे सांगितले तसेच“निर्भया अभियान”चे उद्दिष्ट सांगताना महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, आपत्कालीन प्रसंगी योग्य कृती कशा पद्धतीने केली पाहिजे हे सांगितले भीती नाही, सजगता हवी! असेही त्या बोलल्या. त्यांच्यासोबत निर्भया पथकातील रेखा साळे, दामिनी पथकातील अनिता सहाणे, सोनाली माळी यादेखील उपस्थित होत्या.        शेवटी अध्यक्षीय भाषण करताना डॉ.मृत्युंजय कापसे यांनी स्त्री ही शक्तीचे, धैर्याचे आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. मात्र बदलत्या सामाजिक परिस्थितीत तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा वेळी हे अभियान केवळ कार्यक्रम नसून सजगतेचा आणि आत्मविश्वासाचा जागर आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रोहिणी जगताप तसेच आभार प्रा.पुनम मगर यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप सामूहिक पसायदानाने झाला.

Share

Other News

ताज्या बातम्या