आजच्या गतिमान युगात ईश्वरावरची श्रद्धा आत्मबल वाढवते - डी. पी. सावंत यांचे प्रतिपादन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/02/2026 11:43 AM

नांदेड :- सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. माणूस सतत गतिशील आणि व्यस्त झाला आहे. अशा विज्ञान युगात श्रद्धेला पण अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणूनच आजच्या गतिमान युगात ईश्वरावरची श्रद्धा आत्मबल वाढवते असे प्रतिपादन माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केले.
 शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून, अलीकडेच नांदेडच्या शंकरराव चव्हाण सभागृहात भक्ती आणि संगीताचा सुरेख संगम असलेला सकळ सिद्धी गजानन हा अभंग महोत्सव आयोजित केलेला होता.  मृणाल अमरनाथ राजूरकर यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली होती.या महोत्सवाचे उद्घाटन करताना डी. पी. सावंत बोलत होते. नांदेड येथील कवी देवीदास फुलारी यांनी गजानन विजय या ग्रंथावर आधारित २१ अभंग रचले असून संगीतकार आनंदी विकास यांनी या प्रारूप अभंगाला संगीतबद्ध केले आहे. या कार्यक्रमाचे निरूपण प्रख्यात निवेदक ॲड गजानन पिंपरखेडे यांनी केले. यावेळी  व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अमरनाथ राजुरकर , शंतनु डोईफोडे, आशिष नेरलकर, शांभवी साले यांची उपस्थिती होती. प्रारंभी उद्योगपती आणि कार्यक्रमाचे प्रायोजक राम शेट्टी तुप्तेवार यांनी प्रास्ताविक केले.या अभंग महोत्सवात साईप्रसाद पांचाळ ,वैभव पांडे ,वर्षा जोशी, विलीना पात्रा हे नामांकित गायक सहभागी झाले होते. पंकज शिरभाते यांचे व्हायोलिन ,विठ्ठल चुनाळे यांची बासरी आणि विश्वेश्वर कोलंबीकर  यांच्या मृदगंधाचा नाद हे या कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. संवादिनी विकास देशमुख , तबला हरिप्रसाद पांडे , ॲक्टोपॅड अमोल देशपांडे ,की बोर्ड राज लांमटिले आणि साइड रिदम भगवानराव देशमुख होते .प्रारंभिक निवेदन  बापू दासरी यांनी केले.मैफलीच्या शेवटी ललित कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी इबितदार यांनी आभार मानले. या वेळी सर्व रसिकांना पिठले भाकरीचा प्रसाद देण्यात आला. या अभंग महोत्सवात रसिकांनी गर्दी केली होती.

Share

Other News

ताज्या बातम्या