सांगली - मिरज - कुपवाड महापालिकेवर महापौर म्हणून धीरज सूर्यवंशी व उपमहापौर म्हणून गजानन मगदुम यांचा बिनविरोध विजय

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/02/2026 1:00 AM

*** महापौर-उपमहापौरांचे शहरात जंगी स्वागत

 सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सन २०२६ पासूनच्या पहिल्या सत्रासाठी महापौर आणि उपमहापौर निवडीचा सोहळा आज अत्यंत उत्साहात पार पडला. यामध्ये महापौर पदी श्री. धीरज चंद्रकांत सूर्यवंशी यांची तर उपमहापौर पदी श्री. गजानन रामू मगदूम यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी यांनी घोषित केले.

विभागीय आयुक्त, पुणे यांच्या आदेशानुसार, ही निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी आज मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता मनपा मुख्यालयातील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

🙏 शोकप्रस्ताव आणि श्रद्धांजली
सभेचे कामकाज सुरू असतानाच, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे सभागृहात प्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यानंतरच पुढील निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली.

   निवडणूक प्रक्रियेचा तपशील:
पीठासीन अधिकारी म्हणून श्री. विशाल नरवाडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली) यांनी कामकाज पाहिले. या विशेष सभेसाठी महानगरपालिकेचे एकूण ७४ सदस्य उपस्थित होते.

१. महापौर निवड (बिनविरोध):
महापौर पदासाठी श्री. धीरज चंद्रकांत सूर्यवंशी यांचे दोन अर्ज प्राप्त झाले होते. छाननीमध्ये दोन्ही अर्ज वैध ठरले. या पदासाठी अन्य कोणताही अर्ज न आल्याने पीठासीन अधिकारी श्री. विशाल नरवाडे यांनी सकाळी ११:५० वाजता धीरज सूर्यवंशी यांची महापौर पदी बिनविरोध निवड जाहीर केली.

२. उपमहापौर निवड (बिनविरोध):
उपमहापौर पदासाठी श्री. गजानन रामू मगदूम यांचे दोन अर्ज प्राप्त झाले होते. या पदासाठीही एकच नाव आल्याने दुपारी १२:१५ वाजता गजानन मगदूम यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

   नूतन पदाधिकाऱ्यांचा परिचय:
 * महापौर: श्री. धीरज चंद्रकांत सूर्यवंशी (प्रभाग १२-ड)
 * उपमहापौर: श्री. गजानन रामू मगदूम (प्रभाग २-ब)

  पारदर्शक प्रक्रिया
सदर निवडणूक प्रक्रियेवेळी महापालिका आयुक्त श्री. सत्यम गांधी आणि सर्व अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे अधिकृत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून, प्रशासनाने सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करून ही निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडली.

नूतन महापौर आणि उपमहापौर यांचे आयुक्त, अधिकारी आणि सर्व सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सांगली-मिरज-कुपवाड शहराच्या विकासाचा गाडा आता या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अधिक वेगाने पुढे जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Share

Other News

ताज्या बातम्या