स्वारातीम विद्यापीठात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 26/01/2026 9:37 AM

नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात आज सोमवार, दि.२६ जानेवारी, २०२६ रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते चंदनहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यानंतर कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
यावेळी प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.के. पाटील, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.पराग खडके, आंतरविद्याशाखीय अभ्यास मंडळाचे अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत बाविस्कर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड यांच्यासह विद्यापीठातील विविध संकुलाचे संचालक, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी मागील एका वर्षात विद्यापीठात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा व शैक्षणिक, संशोधनात्मक व प्रशासकीय कार्याचा सविस्तर आढावा घेतला. विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले, त्या सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
याच कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. या समारंभास विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या