नांदेड :- महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे यासाठी सन 2023 मध्ये राज्यातील सार्वजनिक मंडळाना पुरस्कार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर यावर्षीही सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असून जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रथा सुरु केली. यावर्षी 7 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील सर्वोकृष्ट सार्वजनिक मंडळाना पुरस्कार देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2024 अंतर्गत मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या सर्वोकृष्ट सार्वजनिक गणेश मंडळास 5 लक्ष रुपये , द्वितीय क्रमांकास 2 लाख 50 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 1 लक्ष रुपये रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित 41 जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषीक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 31 जुलै 2024 च्या शासन निर्णयासोबत स्पर्धा निवडीचे निकष, अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या अर्जाच्या नमुन्यानुसार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या
[email protected] या ईमेलवर 31 ऑगस्ट 2024 पर्यत अर्ज सादर करावेत, असेही पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.