*मजुरांच्या प्रलंबित निधीसाठी पालकमंत्री सरसावले* *मनरेगाचे प्रलंबित ३ कोटी ८० लक्ष रुपये मजुरांच्या खात्यात जमा करा* *ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 20/07/2024 2:11 PM

◼️मजुरांच्या प्रलंबित निधीसाठी पालकमंत्री सरसावले*

◼️मनरेगाचे प्रलंबित ३ कोटी ८० लक्ष रुपये मजुरांच्या खात्यात जमा करा*

◼️ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती*

चंद्रपूर, दि. २० : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. मात्र या कामांवर असलेल्या मजुरांना गेल्या अनेक दिवसांपासून कामाचा मोबदला मिळालेला नाही. मजुरी न मिळाल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या मजुरांना दिलासा देण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. ना. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. मनरेगाचे प्रलंबित ३ कोटी ८० लक्ष रुपये मजुरांच्या खात्यात जमा करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.*

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची चंद्रपूर जिल्ह्यात सार्वजनिक व वैयक्तिक स्वरुपाची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. परंतु माहे मे २०२४ पासून ते आजपर्यंत या कामांवर असलेल्या मजुरांची मजुरी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली नाही. त्यामुळे या मजुरांना जीवनावश्यक दैनंदिन गरजा भागविणे अतिशय कठीण होत आहे. याबाबत अनेक मजुरांच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची तात्काळ दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मजुरांचे प्रलंबित ३ कोटी ८० लक्ष रुपये बँक खात्यात जमा करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावे,  अशी विनंती केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित ३ कोटी ८० लक्ष रुपये मजुरांची मजुरी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याबाबत उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी मनरेगा आयुक्तांना यापूर्वीच कळविले असल्याचेही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात म्हटले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या