एसटी डेपो नांदेड आगारातील तीन कर्मचार्‍यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ उत्साहात संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/02/2023 4:19 PM

नांदेड- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथील विविध पदावरील तीन कर्मचारी वयाची ५८ वर्षे पूर्ण करुन प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल दि. ३१ जानेवारी २०२३ मंगळवार रोजी दुपारी ठिक २ वाजता त्यांचा आगाराच्यावतीने सपत्नीक हृदय सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला.
यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी सखाराम गंगाराम कांबळे (चालक क्रं. १६७०६) ३२ वर्षे सेवा, विलास गणपतराव हाटकर (वाहक क्रं १७७८) २५ वर्षे सेवा, विनोद नारायणराव जोशी (वाहक क्रं. २७३६५) २५ वर्षे सेवा यांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम हे होते तर विचारमंचावर विभागीय वाहतुक अधिकारी संजय वाळवे, मा. नगराध्यक्ष कंधार रामराव पवार, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, लेखाकार सतीश गुंजकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, कामगार नेते रामदास पेंडकर, वाहतुक नियंत्रक बालाजी शिंदे, उदय पांडे, वरिष्ठ लिपीक राजेंद्र निळेकर, नितीन मांजरमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व प्रथम आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम यांच्या हस्ते तिन्ही सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा शाल, श्रीफळ, प्रवास बॅग, स्मृतीचिन्ह, पुष्पहार देऊन सपत्नीक हृदय सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी संयोजन समितीच्यावतीने सर्व मान्यवरांचा सत्कार राजू घागरदरे, रघुनाथ वाघमारे, एम.डी. गौस, कांतीलाल दुर्गे, महेश सांगवीकर, कल्पना मोरे, सविता निलेवाड, राजेश गट्टू यांनी सत्कार केला. याप्रसंगी विनाअपघात २५ वर्षे सुरक्षित सेवा देऊन आगाराचे सात चालक रोख रक्कम २५ हजाराचे पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल प्रातिनिधीक स्वरुपात चालक बेगाजी दिगंबर बोरकर यांचा कामगारांच्यावतीने गुणवंत एच. मिसलवाड यांनी त्यांचा सत्कार करुन गौरव केला. यावेळी सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.
शेवटी अध्यक्षीय समारोप आशिष मेश्राम यांनी केला. ते आपल्या भाषणात म्हणाले की, तिन्ही कर्मचार्‍यांनी प्रवासी सेवेमध्ये मोठे योगदान दिले असून आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन प्रवाशांना जास्तीत जास्त दर्जेदार सेवा देण्याची काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन मांजरमकर यांनी मांडले. याप्रसंगी सर्व युनियनचे पदाधिकारी, कामगार- कर्मचारी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या