ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

लाखांदूर तालुक्यात धान्य साठयाकरिता तयार होणार नवे सहा गोडाऊन


  • लक्ष्मण फुंडे (पवनी)
  • Upadted: 10/29/2020 6:51:01 PM● एकूण 10800 मेट्रिक टन असेल गोडाउनची क्षमता

● विधानसभा अध्यक्ष मा. ना. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या प्रयत्नांना यश

जिल्हा प्रतिनिधी भंडारा :- लक्ष्मण फुंडे


भंडारा :- भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जाते. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते मात्र घेतले गेलेले उत्पादन किंवा त्याची साठवणूक करण्यासाठी कुठल्याही तालुक्यांमध्ये मोठी जागा म्हणजे गोडाऊन नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वेळा गोडाऊनच्या बाहेर असलेला धान देखील नैसर्गिक आपत्तीमुळे खराब होत होता, शासनाकडे नवीन आणि मोठ्या गोडाउनची मागणी करण्यात आली होती. हा विषय गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र विधानसभा अध्यक्ष मा. ना. श्री. नानाभाऊ पटोले यांनी प्रयत्न करून हा विषय मार्गी लावलेला आहे. 

विशेष बाब म्हणून भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये गोडाऊन बांधण्यासाठी मंजुरी मिळालेली असुन लाखांदूर तालुक्यातील जिरोबा येथे 10800 मे. टनचे म्हणजे प्रत्येकी 1800 टनचे सहा गोडाउन मंजूर झालेले आहे. यापूर्वी लाखांदूर तालुक्यामध्ये 1500 मेट्रिक टन क्षमतेचे 1 गोडाऊन आहे. मात्र प्रधान साठवणुकीकरिता व्यवस्थित आणि निश्चित अशी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे अवकाळी पाऊस आणि या प्रकारच्या आपत्तीमुळे धान्य खराब होत असते. आणि म्हणून मोठ्या गोडाऊनची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती, ह्या मागणीच्या संदर्भाने नवीन 6 गोडाऊन बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर यांनी प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे दिला होता. सदर गोदामाच्या अंदाजपत्रकास व बांधकामास सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक सहमती दिलेली असून या प्रस्तावाची किंमत पंधरा कोटींपेक्षा जास्त असल्यामुळे या प्रस्तावास माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने चक्रीय पद्धतीने मान्यता दिलेली आहे. ही बाब शासकीय गोदाम बांधकामाच्या अंदाजपत्रकास व कामास नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पाअंतर्गत प्रशासकीय मंजुरी देण्याची बाब म्हणून शासनाच्या विचाराधीन होती. यावर दिनांक 27 ऑक्टोबर 2020 रोजी शासन निर्णय करून 10800 टन क्षमतेच्या या गोदाम बांधकामाच्या अंदाजपत्रकास व कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या प्रस्तावित गोदामाची अंदाजपत्रकीय किंमत ही 29 कोटी 96 लक्ष 38 हजार रुपये असून सुमारे 23 कोटी 61 लक्ष 68 हजार रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे.

लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना विशेष करून याचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण या भागातील 90 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणून इथल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब या ठिकाणी आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण यानिमित्ताने आहे.

येणाऱ्या दिवसांमध्ये साकोली आणि लाखनी तालुक्यामध्ये देखील याप्रकारचे मोठे गोडाऊन निर्माण करण्यात येतील, शेतकरी कष्टकरी जनतेसाठी आणि आपल्या भागातील लोकांच्या सोई सुविधासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे विधानसभा अध्यक्ष मा. ना. श्री. नानाभाऊ पटोले यांनी सांगितले.

Share

Other News