नांदेड पोलीस आयुक्तालयासाठी खा.अशोकराव चव्हाणांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/03/2026 7:16 PM

नांदेड :- राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज मुंबई येथे राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. या भेटीत नांदेड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत तसेच सेफ सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची लवकरात लवकर निर्मिती करण्याची गरज खा. अशोकराव चव्हाण यांनी सदर भेटीत अधोरेखित केली. याबाबतच्या पुढील कार्यवाहीवर देखील विचारविनिमय झाला. सेफ सिटी प्रकल्पांतर्गत नांदेड शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या प्रस्तावावरही याप्रसंगी चर्चा झाली. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने प्रसिद्ध केलेले घोषणापत्र ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’मध्ये नांदेडला या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

बैठकीला उपस्थित भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी तालुका मुख्यालयांच्या शहरांचा सेफ सिटी प्रकल्पात समावेश करण्याची सूचना मांडून भोकर, मुदखेड व अर्धापूर येथे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, नांदेड शहर पोलीस आयुक्तालय व ‘सेफ सिटी प्रोजेक्ट’साठी शासन स्तरावर पुढील पाठपुरावा करण्यात येईल, असे खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. या बैठकीला पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) सुवेझ हक देखील उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या