नांदेड:-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरात विद्यार्थ्यांना एका संकुलातून दुसऱ्या संकुलात तसेच प्रशासकीय इमारतीत जाणे सुलभ व्हावे, यासाठी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने ‘गोल्फ कार’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या गोल्फ कारचे उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा परिसर सुमारे ५५० एकरांवर विस्तारलेला आहे. या विस्तीर्ण परिसरात विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संकुले, विभाग तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये ये-जा करताना मोठे अंतर पायी पार करावे लागत होते. विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून गोल्फ कारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ही गोल्फ कार बॅटरीवर चार्ज होणारी असून सौरऊर्जेवरही चार्ज करता येणार आहे. एकावेळी सात विद्यार्थ्यांना प्रवास करता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांची ये-जा अधिक सुलभ होण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार आहे.
गोल्फ कारच्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य महादेव गव्हाणे, डॉ प्रशांत पेशकार, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, इंजिनिअर नारायणराव चौधरी, डॉ. हनुमंत कंधारकर, ज्येष्ठ सिनेट सदस्य प्रमोद देशमुख, डॉ अशोक गुजराती, प्राचार्य डॉ बालाजी कांबळे, प्राचार्य डॉ दीपक बच्चेवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखा अधिकारी डॉ राजेश शिंदे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
विद्यापीठ प्रशासनाच्या या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या परिसरात सुरक्षित, सुलभ आणि पर्यावरणपूरक पद्धतीने प्रवास करता येणार असून, विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी-केंद्रित सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. यामुळे विद्यार्थी आनंदीत झाले आहेत.