नांदेड येथे उच्च मूल्याच्या स्नेचिंग प्रकरणातील दोन आरोपी ताब्यात, छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे मालमत्ता चोरी प्रकरणात एक आरोपी अटक

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 02/04/2026 7:30 PM

नांदेड :- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दलाने (RPF) ऑपरेशन रेल सुरक्षा आणि ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत गुप्त माहिती व सतर्क देखरेखीच्या आधारे रेल्वे मालमत्ता व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केलेल्या कारवाईत महत्त्वपूर्ण यश मिळविले आहे.

रेल्वे मालमत्ता चोरी प्रकरणात अटक – ऑपरेशन रेल सुरक्षा

दिनांक ०१.०४.२०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे उपनिरीक्षक श्री के. चंदुलाल, तसेच श्री गणेश काळे (हेड कॉन्स्टेबल-०२१/RPF/छत्रपती संभाजीनगर) आणि श्री रणजीत सिंग (कॉन्स्टेबल-१९३५/CIB/नांदेड) यांच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर–चिकलठाणा या दरम्यान गुप्त पाहणी करून छत्रपती संभाजीनगर स्थानक यार्डमधून चोरी झालेल्या रेल्वे साहित्याच्या प्रकरणातील आरोपीचा शोध घेतला.

कारवाईदरम्यान स्थानक यार्डातील रेल्वे रुळाजवळ संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. पंचांच्या उपस्थितीत चौकशी केल्यावर त्याने आपले नाव सनी, राहणार छत्रपती संभाजीनगर असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याने २२.०२.२०२६ रोजी स्थानक यार्डमधून सुमारे ३० मीटर कॅटेनरी वायर (तांबे) आणि ७.५ मीटर डिस्चार्ज केबल चोरी करून ती रेल्वे रुळाजवळ लपवून ठेवल्याची कबुली दिली.

सदर चोरीचा माल आरोपीने दाखविलेल्या ठिकाणाहून जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध RPF पोस्ट/छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा क्रमांक ०२/२०२६, कलम ३(अ), RP(UP) अधिनियम १९६६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर आरोपीला BNSS २०२३ च्या कलम ३५(१)(३) अंतर्गत नोटीस देऊन सोडण्यात आले असून आवश्यकतेनुसार माननीय JMFC/रेल्वे न्यायालय, छत्रपती संभाजीनगर येथे हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उच्च मूल्याच्या स्नेचिंग प्रकरणातील दोन आरोपी ताब्यात – ऑपरेशन यात्री सुरक्षा

दरम्यान, RPF आणि GRP च्या संयुक्त पथकाने नांदेड येथे घडलेल्या उच्च मूल्याच्या स्नेचिंग प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळविले. हा गुन्हा GRP/नांदेड येथे गुन्हा क्रमांक ६४/२०२६, कलम ३०४(२), BNS २०२३ अंतर्गत २६.०२.२०२६ रोजी नोंदविण्यात आला होता.

सदर प्रकरणात एका महिला प्रवाशाचा सुमारे १६८ ग्रॅम सोन्याचे दागिने, हिरे तसेच सुमारे १०० ग्रॅम चांदीच्या वस्तू असलेली पर्स, अंदाजे ₹७,२०,००० किंमतीची, ट्रेन क्रमांक ०७०५४ (जयपूर–काचीगुडा स्पेशल एक्सप्रेस) मधील कोच B-5, बर्थ क्रमांक २० येथे नांदेड–मुदखेड दरम्यान २५/२६.०२.२०२६ च्या मध्यरात्री सुमारे ०२:३५ वाजता हिसकावून नेण्यात आली होती.

दिनांक ०१.०४.२०२६ रोजी सायं. १८:०० वाजता, नांदेड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर RPF आणि GRP च्या संयुक्त पथकाने गुप्त पाहणी केली. या कारवाईत श्री दिलीप कांबळे (SI/CIB-D&I/नांदेड), श्री एम. जी. चौव्हाण (HC/CIB-D&I/नांदेड), श्री के. बालाजी (HC/CIB-D&I/नांदेड) आणि श्री कुंदन सिंग (कॉन्स्टेबल/CIB/नांदेड) तसेच GRP कर्मचारी सहभागी होते.






या दरम्यान दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपींनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितलीः
• श्रीकांत – राहणार नांदेड
• शंकर – राहणार नांदेड

दोन्ही आरोपींनी स्नेचिंग प्रकरणात सहभाग असल्याची कबुली दिली. त्यांना पुढील चौकशीसाठी GRP/नांदेड कार्यालयात नेण्यात आले असून प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यात त्यांना जोडण्यात आले आहे. चोरीचा माल जप्त करण्यासाठी पुढील तपास सुरू असून आरोपींना ०२.०४.२०२६ रोजी माननीय JMFC/नांदेड न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड (PCR) मागण्यात येणार आहे.

या यशस्वी कारवाईमुळे रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी RPF आणि GRP कर्मचाऱ्यांची सतर्कता व समन्वयित प्रयत्न अधोरेखित झाले आहेत. नांदेड विभाग सर्व प्रवाशांसाठी सुरक्षित व संरक्षित रेल्वे प्रवास सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या