♦️ आताचे रेल्वे स्टेशन आणि नव्याने होणारे रेल्वे स्टेशन यांची कनेक्टीव्हिटी आवश्यक
मिरज रेल्वे जंक्शनवरील प्रवासी रेल्वे गाड्यांचा तसेच, माल वाहतूक गाड्यांचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी मिरज रेल्वे जंक्शनपासून सुमारे एक किमी अंतरावर कृष्णाघाट परिसरात कार्डलाईन स्टेशन होणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने १२८.७८ कोटींच्या निधीला मंजूरी दिली आहे. कार्डलाईन स्टेशनचा विकास आराखडा तयार करताना मिरज रेल्वे जंक्शनचा सुध्दा समांतर विकास आराखडा तयार करण्याची मागणी मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैैष्णवी यांच्यासह वरिष्ठ रेल्वे विभागाला पाठविले आहे.
हुबळी-मिरज-पुणे दुहेरीकरण झाल्याने भविष्यात रेल्वे प्रवासी व माल वाहतूक गाड्यांची संख्या वाढणार आहे. तसेच, कोल्हापूरहून बेळगांव आणि सोलापूर दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मिरज जंक्शनवर येऊन पुढे जाणे यात सुमारे अर्धा तास वेळ वाया जात आहे. म्हणून रेल्वे प्रशासनाने वर्षभरापूर्वी कार्डलाईन स्टेशनसाठी सर्वेक्षण केले होते. मात्र, निधी अभावी काम रखडले होते.
शिवाय, मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून अनेक वेळा मिरज जंक्शनची घोषणा झाली. कोल्हापूर, सांगली, कुडची, घटप्रभा, गोकाक रोड, बेळगांव रेल्वे स्टेशनचा विकास झाला. मात्र, निधी अभावी मिरज रेल्वे जंक्शनचा विकास रखडला आहे.
रेल्वे मंत्रालयाने मिरज रेल्वे जंक्शनपासून सुमारे एक किमी अंतरावरील कार्डलाईन स्टेशनसाठी १२८.७८ कोटींची निधीला मंजूरी दिली आहे. कार्डलाईन स्टेशनचा विकास आराखडा तयार करताना मिरज रेल्वे जंक्शनचा सुध्दा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. जेणेकरून आताचे मिरज रेल्वे जंक्शन आणि नव्याने होणारे कार्डलाईन स्टेशन या दोन्ही स्टेशनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी कशा पध्दतीने कनेक्टीव्हिटी असणार आहे? हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. मिरज जंक्शनचा विकास प्रलंबित ठेवून कार्डलाईन स्टेशनचा विकास करणे हे भविष्याच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रवाशांची गैरसोय आणि रेल्वेच्या आर्थिक तोट्याचे होणार असल्याचे मत रेल्वे प्रवासी संघाचे अॅड. ए. ए. काझी यांनी व्यक्त केले आहे. यावेळी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नरेश सातपुते, कार्यवाह जहीर मुजावर, मिरज सुधार समिती अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह असिफ निपाणीकर, वसीम सय्यद, संतोष जेडगे, दिनेश तामगावे आदी सदस्य उपस्थित होेते.