यजमान सांगली जिल्हा संघ किशोर - किशोरी गटात अजिंक्य तर पुणे संघास पुरुष व महिला गटात दुहेरी विजेतेपद...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/02/2024 3:57 PM

      कुपवाड येथे झालेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत किशोर-किशोरी गटातील सामन्यांचा थरार सांगलीकर क्रिडाप्रेमींनी अनुभवला. त्यामध्ये यजमान सांगलीच्या संघानी दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. किशोरी गटात धाराशिव तर किशोर गटात ठाणे उपविजयी ठरले. पुरूष व महिला गटाचे पुणे जिल्ह्याने दुहेरी विजेतेपदाचा मान पटकावला तर महिलांमध्ये धाराशिव आणि पुरूषांमध्ये मुंबई उपनगरने उपविजेतेपद पटकावले.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मान्यतेने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, सांगली जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून व शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ कुपवाड  यांच्या संयोजनाखाली  कुपवाड येथील #शिवप्रेमी क्रीडांगण अकूज ड्रीमलँड येथे कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भाजप नेते शेखर इनामदार, सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डाॅ. चंद्रजीत जाधव, नगरसेवक गजानन मगदुम, महाराष्ट्र खो-खो  असोसिएशनचे सचिव अॅड. गोविंद शर्मा, क्रीडा विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सांगली जिल्हा खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष समीर शेख, सचिव प्रशांत इनामदार, उद्योजक रमाकांत घोडके, रमेश आरवाडे, शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, राहुल कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. *विजेत्या खेळाडूंना सुमारे 27 लाख रुपयांची रोख बक्षीस देण्यात आली त्याचबरोबर *चारही गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना नगरसेवक गजानन मगदूम व शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने एलईडी टीव्ही भेट देण्यात आली*.
अंतिम सामन्यांचा थरार पाहण्यासाठी हजारो क्रीडाप्रेमी  उपस्थित होते. त्यांची अपेक्षाही किशोर-किशोरी गटातील खेळाडूंनी पूर्ण केली. किशोर गटात सांगलीने ठाण्याचा लघुत्तम आक्रमणापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात पराभव करच कै. भाई नेरूरकर राज्यस्तरीय स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. जादा डावात समान गुण झाल्यामुळे लघुत्तम आक्रमणाचा डाव खेळवण्यात आला.  त्यामध्ये सांगलीने विजय मिळवला. चुरशीच्या सामन्यात सांगलीकडून रितेश भालदार (१.३०,१.५० व १ मि. संरक्षण व ४ गुण), संग्राम डोबळे (२.00, १.00, ३.00 मि. संरक्षण), श्री दळवी (१.००, २.२० व १.३० संरक्षण व ३ गुण) असा खेळ केला. ठाणेकडून खेळताना ओंकार सावंत (२. मि,२ मि, २.२० संरक्षण व तीन गुण), अमन गुप्ता (३. ४०, २.३०, २ मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.किशोरींच्या अंतिम सामन्यात यजमान सांगलीने धाराशिवचा (२५-२२) ३ गुणांनी पराभव करत स्पर्धेतील विजेतेपद पटकावले. आरंभीला दोन्ही संघांचे गुण (15-15) समान झाल्यामुळे जादा डाव खेळवण्यात आला. या डावातील आक्रमणात सांगलीने 10 गुण मिळवले. धाराशिवला आक्रमणात 7 गुणच मिळवता आले. त्यामुळे या सामन्यात सांगली संघ विजयी ठरला. सांगलीकडून वैष्णवी चाफे हिने (१ मि., १.२० मि. संरक्षण व ७ गुण), सुवर्णा तामखडे (१.३०, २ मि., २.00 मि. संरक्षण व २ गुण), पायल तामखडे (१ मि., १. मि. संरक्षण व ७ गुण) असा खेळ करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर धाराशिवकडून मैथिली पवार (१.२०, २.३० मि., १.२० मि. संरक्षण व ७ गुण), मुग्धा वीर (१.१० संरक्षण व ६ गुण), सिद्धी भोसले (१.५० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी चांगला खेळ करत सामन्यात रंगत आणली.
महिला गटात पुण्याने धाराशिव या जिल्ह्याला १ गुण व ४ मिनिटे १० सेकंद राखून  मात केली. पुण्याकडून प्रियांका इंगळे (२.४०, २.१० मि. संरक्षण व ४ गुण), कोमल धारवाडकर (२, १ मि. संरक्षण), काजल भोर (१.३० व १ मि. नाबाद संरक्षण व चार गुण) यांनी पुण्याच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. धाराशिवकडून सुहानी धोत्रे (४ गुण), अश्विनी शिंदे (२ मि., ३ मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.
पुरूष गटात अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरवर १० गुणांनी सहज मात केली. या विजयात पुण्याकडून खेळताना आदित्य गणपुले (२.३०, १.१० मि. संरक्षण व ५ गुण), शुभम थोरात (२.४० मि. संरक्षण), सुयश गरगटे (२ मि. व १ मि. संरक्षण व २ गुण) यांनी मोलाची कामगिरी केली. मुंबई उपनगरकडून अनिकेत चेंदणकर (१.५० व १, १.४० मि. संरक्षण व १ गुण), ऋषिकेश बुरचावडे (१.३०, १.४० संरक्षण व १ गुण) यांनी चांगला खेळ केला.
स्वागत प्रास्ताविक गोविंद शर्मा यांनी केले तर मनोगतात गजानन मगदूम यांनी संपुर्ण स्पर्धेचा आढावा घेतला तर आभार क्रीडाधिकारी किरण बोरवडेकर यांनी मानले..

Share

Other News

ताज्या बातम्या