नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्या अधिपत्याखालील पथकाची नांदेड जिल्हयात रवानगी केली होती.
आज दिनांक 13/04/2026 रोजी, सदर पथकास अर्धापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर येथे सय्यद जाकीर ऊर्फ बाबा गुलाम दस्तगीर, वय 40 वर्ष, रा. इंदिरानगर, अर्धापुर हा नकली सुगंधित जर्दा बनवत असल्याची माहिती मिळाली. यावरून पथकाने सदर इसमाचे घरी छापा टाकला असता, त्या ठिकाणी सुगंधित जर्दा, एक जर्दा बनविण्याची मशीन, ग्लिसरीन व पॅराफीन असा एकूण 3,44,450/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर आरोपी हा कमी प्रतीच्या जर्दा मध्ये ग्लिसरीन व पॅराफीन मिसळून नामांकित कंपनीचा सुगंधित जर्दा तयार करत असे व नंतर मशीनच्या सहाय्याने पॅकींग करून तो बाजारात विक्रीसाठी पाठवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर प्रकरणी, आरोपी सय्यद जाकीर ऊर्फ बाबा यास ताब्यात घेवून त्याचेविरुध्द अर्धापुर पोलीस ठाणे येथे गुरनं 196/2026 कलम 123 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, सदर प्रकरणाचा पुढील तपास अर्धापुर पोलीस ठाण्यातील पोहेकॉ संतोष काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
तत्पूर्वी, सदर पथकाने दिनांक 12/04/2026 रोजी सायंकाळी देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे कुषावाडी शिवार येथील रंजित भाऊराव इंगोले यांचे शेतातील आखाड्यावरील रुममध्ये तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या (8) इसमांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून 36,340/- रुपयांची रोकड, (08) मोबाईल व (7) मोटार सायकली असा एकूण 3,93,340/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यांचेविरुध्द देगलूर पोलीस ठाणे येथे गुरनं 181/2026 कलम 12 (अ), महाराष्ट्र जुगार कायद्याअन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास देगलूर पोलीस ठाण्यातील पोउपनि / महाजन मैसनवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
उपरोक्त दोन्ही कारवायांत, पोलीस पथकाने एकूण 36,340/- रुपयांची रोकड व मुद्देमाल असा एकूण 7,37,790/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीतांविरुद्ध वरीलप्रमाणे गुन्हे नोंद केले आहेत.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ / प्रदिप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ/ गणेश धुमाळ व पोकों / कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती गोपनीयपणे, 91 50 100 100 या 'खबर' हेल्पलाइन वर द्यावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.