जनगणना प्रक्रियेत प्रत्येक अधिकारी- कर्मच्याऱ्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी - जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 26/03/2026 6:50 PM

नांदेड : जनगणना हे राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्य असून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नियोजनासाठी संकलित डेटा महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले.

कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे जनगणना २०२७ अनुषंगाने आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक वीरेंद्र दीक्षित, सांख्यिकी अधिकारी मयूर पवार व नेहाल धुरंधरे यांनी जनगणनेची पार्श्वभूमी, प्रक्रिया व संकल्पना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत जनगणना प्रक्रियेचा पाया, अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका, तसेच पहिल्या टप्प्यातील घरयादी व ३४ मुद्द्यांवरील माहिती संकलन याबाबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी झेनितचंद्र र दोनतुला, अनन्या रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, मनपा उपायुक्त अभिजीत वायकोस, तहसीलदार विपीन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

*चौकट : स्व-गणनेची विशेष सुविधा*

निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी सांगितले की, जनगणना दोन टप्प्यांत होणार आहे.
पहिल्या टप्प्यात घरयादी व गणना, तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना केली जाईल.

१६ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरभेटी देऊन माहिती संकलित करतील.

यापूर्वी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्व-गणना करण्याची सुविधा उपलब्ध असणार असून, मोबाईलच्या माध्यमातून संकेतस्थळावर माहिती भरता येणार आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणाऱ्या या जनगणनेत नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या