नांदेड :- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन होऊन इतर खेळाडूंना प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सन २०२४-२५ या वर्षासाठी जिल्ह्यातील क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समितीमार्फत छाननी करण्यात आली असून गुणांकनानुसार पात्र ठरलेल्या पुरस्कारार्थींची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
या अंतर्गत श्रेयष दिलीप मार्कंडेय (योगासन) यांना गुणवंत खेळाडू – पुरुष तर यशोधन विजयकुमार रावणकोळे (बॅडमिंटन) यांना गुणवंत खेळाडू – दिव्यांग पुरुष या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच भाग्यश्री माधवराव जाधव (ॲथलेटिक्स – भालाफेक व गोळाफेक) या खेळाडूने पॅरा ॲथलेटिक्समध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत खेळाडू – दिव्यांग महिला (थेट पुरस्कार) प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी ४ थी एशियन पॅरा गेम्स २०२३-२४ (हांगझोऊ, चीन) मध्ये रौप्यपदक, पॅरा गेम्स २०२४ (पॅरिस) तसेच पॅरा ऑलिम्पिक गेम्स २०२० (टोकियो, जपान) मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी या पदावर थेट नियुक्ती दिली असून त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्याचा जिल्हा क्रीडा पुरस्कार थेट प्रदान करण्यात येत आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२४-२५ वितरण कार्यक्रम ७७ व्या प्रजासत्ताक दिनी मुख्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील खेळाडू, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी तसेच क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.