राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी व्यासपीठ – कुलसचिव डॉ. डी. डी. पवार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 12/03/2026 4:22 PM

नांदेड :- राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ही केवळ एक उपक्रम नसून विद्यार्थ्यांना समाजाशी जोडणारी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणारी एक महत्त्वाची चळवळ आहे,” असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. डी. डी. पवार यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे धनगरवाडी येथे दि. ५ ते ११ मार्च २०२६ दरम्यान आयोजित विशेष वार्षिक युवा शिबिराच्या समारोप प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
डॉ. पवार म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना ‘नॉट मी बट यू’ (मी नव्हे, तर तू) या तत्त्वावर आधारित समाजाभिमुख जीवनाची शिकवण देते. शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील वास्तव समस्यांची जवळून ओळख होते आणि त्यामुळे त्यांच्यात सामाजिक जाणीव अधिक प्रगल्भ होते.
एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, व्यवस्थापन कौशल्य आणि समाजसेवेची भावना विकसित होते. स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना कमी संसाधनांमध्ये प्रभावी काम कसे करायचे याचे प्रशिक्षण मिळते. गावागावांत उभारलेल्या शौचालयांच्या मागेही एनएसएस स्वयंसेवकांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
समाजपरिवर्तनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी शिबिरातील सात दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देतात, असे मत व्यक्त केले. कोरोनानंतर विद्यार्थ्यांचा सामाजिक कार्यातील सहभाग काही प्रमाणात कमी झाल्याची खंत व्यक्त करत तरुणांनी अशा उपक्रमांत अधिक सक्रिय व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिबिरार्थी पूजा हिने गेल्या सात दिवसांतील अनुभव कथन करताना बंधारा बांधणे, ग्रामस्वच्छता, ग्रामस्थांशी संवाद तसेच दररोजच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांमुळे गावाशी एक वेगळी नाळ जुळल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाला दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रकाश निहलानी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस संचालक मारोती गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन माध्यमशास्त्र संचालक तथा एनएसएस समन्वयक प्रा. डॉ. सुहास पाठक यांनी केले, तर प्रा. गिरीश जोंधळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. टाळ्यांच्या गजरात स्वयंसेवकांचे अभिनंदन करून शिबिराची सांगता करण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या