*महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार व्हावा* *ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे महसूल मंत्र्यांना पत्र* *सीईटीच्या नोंदणीमध्ये विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणींकडे वेधले लक्ष*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 22/07/2024 12:55 PM

◼️महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार व्हावा*

◼️ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे महसूल मंत्र्यांना पत्र*

◼️सीईटीच्या नोंदणीमध्ये विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणींकडे वेधले लक्ष*

चंद्रपूर,दि.20 - राज्यभरातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार व्हावा, अशी विनंती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्त्य व्यवसाय तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे-पाटील यांना केले आहे. यासंदर्भात पत्र लिहून संपामुळे सीईटीची नोंदणी करण्यात विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणींकडेही त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्र राज्यातील महसूल कर्मचारी संघटनेने १० जुलैपासून संप पुकारला आहे.  दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनूसार कर्मचारी कपात न करणे, अव्वल कारकून/मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना नायब तहसिलदार या पदावर पदोन्नती देणे, नविन आकृतीबंधानुसार पुरवठा विभागातील लिपीक-टंकलेखक व अव्वल कारकून/पुरवठा निरीक्षकांची पदे सरळ सेवेने भरणे, महसूल विभाग, रोहयो, निर्वाचन व तत्सम विभागाचे वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढणे, महसुल सहाय्यक व तलाठी या पदांचा ग्रेड पे वाढविणे आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. परंतु, विद्यार्थ्यांना एका मोठ्या अडचणीचा सामना यामुळे करावा लागत आहे, याकडे आपण लक्ष द्यावे. तसेच महसूल कर्मचारी संघटनेसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे केले. 

महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेची नोंदणी 24 जुलै २०२४ पर्यंत करायची आहे. परंतु, इतर योजनांसाठी तहसील कार्यालयांमध्ये झालेल्या गर्दीत अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे महसूली दाखले काढणे शक्य झाले नाही. आता तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळणे बंद झालेले आहेत. अशा परिस्थितीत 24 तारखेपर्यंत सीइटी चे रजिस्ट्रेशन करणे,  डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करणे अशक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रीमी लेयर सर्टीफिकेट व महसूल विभागाशी संबंधीत इतर अनेक सुविधांचा खोळंबा होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी नागरी सेवांची पर्यायी व्यवस्था तातडीने उपलब्ध करून द्या, असे निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहेत. पर्यायी ऑफलाईन सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्यावी. तसेच २४ जुलैपूर्वी सर्व अर्जांवर योग्य कार्यवाही करुन एमएचसीईटी करीता आवश्यक दाखले विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावेत, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या