सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सुखकर भविष्यासाठी जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/05/2026 5:17 PM

नांदेड -  सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या सेवाकाळात शासनामार्फत समाजासाठी महत्त्वपूर्ण कामे केलेली असून, त्यांची सेवा ही शासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेली आहे. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचे आर्थिक, सामाजिक तसेच आरोग्यदृष्ट्या जीवन अधिक सक्षम व सुखकर व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने दोन दिवसीय मार्गदर्शनपर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले. 
      जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, एसबीआयचे मुख्य व्यवस्थापक चव्हाण, व्यवस्थापक राऊत, पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    पुढे त्या  म्हणाल्या, एखाद्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्ती स्वीकारणे हे सहज सोपे नसते. अनेक वर्षे नियमित कार्यालयीन कामकाज, सेवा व जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर निवृत्तीनंतर अचानक जीवनशैलीत बदल होतो. अशा वेळी आता पुढे काय हा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, सेवानिवृत्ती हा प्रत्येक सेवकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून, त्यानंतरचे जीवनही सकारात्मक, निरोगी आणि आनंदी पद्धतीने जगता आले पाहिजे. अनेकदा निवृत्तीनंतर मानसिक आणि शारीरिक बदल जाणवतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन अधिक सुखकर व्हावे, ही जिल्हा परिषदेची जबाबदारी समजून या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सांगितले.
      कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली. त्यानंतर दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त उपस्थितांनी शपथ घेतली. तसेच कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भातील माहितीपटही यावेळी दाखविण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांनी आपल्या आवडी जोपासाव्यात असे सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपलेखा व वित्त अधिकारी विशाल हिवरे यांनी केले तर सूत्रसंचालन मिलिंद व्यवहारे यांनी केले. या प्रशिक्षण शिबिराला सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात येणार आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या