नांदेड :- 'हिंद-दी-चादर' कार्यक्रम तसेच भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदेड शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून आंदोलनात्मक कार्यक्रमांवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी 'हिंद-दी-चादर' हा कार्यक्रम होणार असून दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा राष्ट्रीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने सदर आदेश लागू करण्यात आला आहे.
या आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, महात्मा गांधी पुतळा, तहसील कार्यालय नांदेड, पोलीस अधीक्षक कार्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय वजिराबाद, शासकीय विश्रामगृह, अण्णाभाऊ साठे चौक, कुसुम सभागृह, रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता, एस.टी. ओव्हर ब्रिज, पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र कार्यालय, मोटार परिवहन विभाग, वन विभाग, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, दूध डेअरी, रेल्वे डिव्हिजन, समाज कल्याण कार्यालय आदी परिसरांतील मुख्य रस्त्यांवर दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत उपोषण, आत्मदहन, धरणे, मोर्चे, रॅली, रास्ता रोको आदी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
संबंधितांना नोटीस बजावून म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी उपलब्ध नसल्याने, आणीबाणीच्या परिस्थितीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 (2) नुसार हा एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात आला आहे. हा आदेश दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात आला आहे.