नरेंद्र–देवेंद्र महोत्सवात पाच पत्रकारांना देणार सुधाकर पत्रभूषण पुरस्कार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/01/2026 10:05 AM

नांदेड :- पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना पं.दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुधाकर पत्रभूषण  पुरस्कार वर्ष २०२२ साठी दै.लोकमत समाचार चे पन्नालाल शर्मा, वर्ष २०२३ साठी अभय कुळकजाईकर,वर्ष २०२४ साठी  दै. एकमतचे चारुदत्त  चौधरी , वर्ष २०२५ साठी  दै. सत्यप्रभाचे संतोष पांडागळे, वर्ष २०२६ साठी  दै.सकाळचे रामेश्वर काकडे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा नरेंद्र-देवेंद्र महोत्सवाचे स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी व संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केली आहे.

रोख रु.५०००,स्मृतीचिन्ह, मानपत्र व महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप असून २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी कै.चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड येथे होणाऱ्या “नरेंद्र–देवेंद्र महोत्सव” या दोन दिवसीय काव्य मैफिलीत हजारो रसिकांच्या साक्षीने मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पत्रकारिता क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारे कै.सुधाकरराव डोईफोडे यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो . यापूर्वी गोवर्धन बियाणी, प्राचार्य देवदत्त तुंगार, विजय जोशी, पंढरीनाथ बोकारे, अनिल कसबे, कालिदास  जहागीरदार,सुनील जोशी या माध्यम प्रतिनिधीना सुधाकर पत्रभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या पत्रकारांची माहिती पुढील प्रमाणे आहे.

*पन्नालाल शर्मा* : एमकॉम,डीएड,एमए हिंदी, बीजे,  एमजे ह्या पदव्या घेतलेले पन्नालाल शर्मा यांना हिंदी, मराठी, इंग्रजी व राजस्थानी भाषा येतात.लोकमत समाचार मध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून वरिष्ठ उपसंपादक म्हणून ते कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना मारवाडी समाज गौरव पुरस्कार, सिंधी समाज पुरस्कार, नांदेड पोलीस पुरस्कार,तिरंगा परिवार पुरस्कार, डॉ.शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अनेक बातम्या महाराष्ट्रात गाजल्या आहेत.

*अभय कुळकजाईकर*: १९९३ पासून पत्रकारितेला सुरुवात करणाऱ्या अभय कुळकजाईकर यांनी बीएससी, पत्रकारिता  पदविका, बीजे,एमजे पूर्ण केले आहे. एकमत लातूर,लोकसत्ता पुणे येथे यापूर्वी त्यांनी पत्रकारिता केलेली आहे.ते वर्ष २००० पासून सकाळ वृत्तपत्रात नांदेड आवृत्तीचे मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत होते . काही काळ त्यांनी साम टीव्हीचे विभागीय प्रतिनिधी म्हणून कार्य केले आहे. सध्या ते दैनिक पुण्यनगरी मध्ये कार्यरत आहेत.आतापर्यंत त्यांना सहा पुरस्कार मिळाले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे विशेष वार्तांकन व विश्लेषण करण्यात त्यांचा हातखंडा आहे.भारताच्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींच्या सभेचे वार्तांकन तसेच मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. राजकीय,सामाजिक आणि आर्थिक घडामोडीवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे विशेष वार्तांकन त्यांनी केले आहे.वाचन व पर्यटन हे त्यांचे छंद आहेत.सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देऊन सहकार्य करण्याची त्यांना आवड आहे.

*चारुदत्त  चौधरी*
वृत्तपत्र क्षेत्रात प्रदीर्घ, निष्ठावंत व गुणवत्तापूर्ण कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार चारुदत्त लक्ष्मीकांत चौधरी हे नांदेडच्या पत्रकारितेतील एक विश्वासार्ह नाव म्हणून ओळखले जाते. ८ जुलै १९६५ रोजी जन्मलेले चौधरी यांनी बी.कॉम., बी.जे. अशी शैक्षणिक पात्रता प्राप्त करून पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल टाकले.
१९८५ ते १९९२ या कालावधीत स्टॅनफोर्ड इंजिनिअरिंग या दिल्ली येथील कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्य केले. त्यानंतर १९९२ ते १९९६ या काळात आपलं महानगर, श्रमिक एकजूट व दै. लोकपत्र आदी वर्तमानपत्रांमध्ये विविध पदांवर पत्रकार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. १९९६ ते २०१० या काळात दै. देशोन्नतीमध्ये आवृत्ती प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. सध्या २०१० पासून ते आजतागायत दै. एकमतमध्ये आवृत्ती प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
संपादकीय कामकाज, वितरण व्यवस्था, जाहिरात व्यवस्थापन आणि कार्यालयीन प्रशासन या सर्वच विभागांमध्ये त्यांची कार्यक्षमता उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मराठवाडा क्रांतीवीर पुरस्कार (२००३), रामेश्वर बियाणी पुरस्कार (२००४), अविष्कार फाउंडेशन पुरस्कार मुंबई (२००८), कृष्णाई पुरस्कार (२०१२), के. यशवंत पाध्ये पुरस्कार, मुंबई (२०२०) व कै.पांपटवार जीवनगौरव पुरस्कार (२०२४) असे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
दै. देशोन्नतीमध्ये कार्यरत असताना एका आर्थिक वर्षात जाहिरात ३६ विशेष पुरवण्यांचे प्रकाशन करून त्यांनी विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन संपादक प्रकाश पोहरे यांच्या हस्ते गोल्ड वॉच देवून गौरविण्यात आले.
नांदेडच्या पत्रकारितेला व्यावसायिकता, शिस्त आणि दर्जा देण्यात चारुदत्त चौधरी यांचे योगदान मोलाचे असून, त्यांच्या कार्याचा गौरव हा संपूर्ण पत्रकार बांधवांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. पत्रकारांच्या अधिस्वीकृती समितीवरदेखील त्यांनी आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटविला आहे. त्याचा लाभ मराठवाड्यातील अनेक पत्रकारांना झाला.

*संतोष पांडागळे*
संतोष रामराव पांडागळे हे दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक असून, त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून पत्रकारितेची वाटचाल सुरू केली. कंधार तालुक्यातील शिराधोन येथून लोकपत्रचे ग्रामीण वार्ताहर म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. सन २००१ मध्ये दैनिक मापदंडचे नांदेड शहर प्रतिनिधी, २००२ मध्ये दैनिक सत्यप्रभाचे पूर्णा तालुका प्रतिनिधी आणि २००३ मध्ये दैनिक सत्यप्रभा कार्यालयात उपसंपादक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली.

एप्रिल २०२० मध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दैनिक सत्यप्रभाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. जुलै २०२० मध्ये डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सत्यप्रभाचा १०० पानी विशेषांक प्रकाशित करून पत्रकारितेतील एक नवा विक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली घडविण्यात आला. सत्यप्रभा हे लोकाभिमुख दैनिक बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

सध्या ते नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाचे शासकीय सदस्य, संगम अर्बन मल्टिस्टेट बँकेचे संचालक, शारदा धनवर्धिनी पतसंस्थेचे संचालक, भाजप प्रणीत एस.टी. कामगार संघटनेचे विभागीय संचालक व भाजपचे जिल्हा प्रवक्ते म्हणूनही ते कार्यरत आहेत. पत्रकारिता, संघटन आणि समाजकार्य यांचा समतोल साधत त्यांनी नांदेडमध्ये विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले आहे.

*रामेश्वर काकडे* 
रामेश्वर बालाजीराव काकडे हे दैनिक सकाळ, नांदेडचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून, मागील अठरा वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने कार्य करीत आहेत. मूळ गाव रोडगी, ता. अर्धापूर, जि. नांदेड येथील असलेल्या काकडे यांनी उच्च शिक्षणासोबत पत्रकारितेचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी एम.ए., बी.एड., बी.जे. (गोल्ड मेडलिस्ट), एम.जे. (मास्टर ऑफ जर्नलिझम) तसेच एल.एल.बी. अशी भक्कम शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे.

पत्रकारितेतील त्यांच्या प्रवासात लोकमत या प्रतिष्ठित दैनिकात उपसंपादक म्हणून दहा वर्षे सेवा दिली असून, त्यानंतर नवराष्ट्र या वर्तमानपत्रात दोन वर्षे कार्य केले. 
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि कृषी अशा विविध क्षेत्रांतील विषयांवर त्यांचे अभ्यासपूर्ण, वस्तुनिष्ठ व प्रभावी लेखन प्रसिद्ध होत असते. बातमीमधील अचूकता, मांडणीतील स्पष्टता आणि समाजाभिमुख दृष्टिकोन ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख बनली आहे. नांदेड जिल्ह्यातील पत्रकारितेला गुणवत्ता व विश्वासार्हता देणाऱ्या पत्रकारांमध्ये रामेश्वर काकडे यांचे नाव आदराने घेतले जाते.

Share

Other News

ताज्या बातम्या