##सांगली-मिरज सिव्हिल हॉस्पिटलला शासनाच्या "महालॅब' ला जोडून मोफत चाचण्यांचा लाभ रुग्णांना द्यावा...
सांगली दिनांक १६ एप्रिल,
राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा रुग्णालये महालॅब महाराष्ट्र शासनाच्या नि:शुल्क प्रयोगशाळेला जोडण्यात आली आहेत. मात्र काही ठिकाणी तांत्रिकबाबीमुळे जिल्हा रुग्णालये या प्रयोगशाळेस जोडली गेली नाहीत. याम६ दोन्ही सिव्हिल हॉस्पिटल महालॅबला जोडावेत आणि गोरगरीब रुग्णांना महालॅबकडून केल्या जाणाऱ्या मोफत तपासण्यांचा लाभ मिळावा, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली आहे. आमदार गाडगीळ यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदन पाठवले आहे. निवेदनामध्ये म्हटले आहे की, शासनाच्या नि:शुल्क प्रयोगशाळा असलेल्या महालॅबकडून कोविड रुग्णांशी संबंधित डी. डायमर, ट्रोपोनीन, इंटरल्युकीन 6, एलएफटी, केएफटी, एस-इलेक्ट्रोलेटटस आदी सर्व प्रकारच्या तपासण्या, इतर रुग्णांसाठी थायरॉईड, कॅन्सर मार्कर, सिकल सेल, ऍनेमिया, गर्भवती महिलांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, यकृत, मूत्रपिंड, सोडियम, पोटॅशियम, युरीक ऍसिड, एलडीएस आदी सर्व आजारांशी संबंधित जिल्हा रुग्णालयाला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची मोफत सोय आहे. यामुळे सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलला महालॅबची प्रयोगशाळा जोडण्यात ज्या अडचणी आहेत त्या दूर करून गरीब रुग्णांना महालॅबच्या नि:शुल्क तपासण्यांचा लाभ मिळावा, असे यामध्ये म्हटले आहे.