भूत लागल्याचे सांगून जादूटोणा करणाऱ्या दोन भोंदू बाबांना अटक

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 26/02/2021 8:16 PM

अखेर 14 वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणी भूत लागल्याचे सांगून जादूटोणा केल्याच्या आरोपावरून  ऊत्तम अवघडे व रामचंद्र सावंत या दोन भोंदू बाबांवर वर जादूटोणा विरोधी कायद्याने पहाटे 1.30 वा दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 दोन्ही आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे. अंधश्रद्धा अजून ही खेडोपाड्यात जोपासली जात आहे.त्याला खतपाणी घालणारे भोंदूबाबां ही खेडोपाडी आहेत.परंतु त्यावर समाजातून आवाज उठवला जात नाही.एखादी घटना पुढे आल्यावर चर्चा होते.मुलीच्या आई वडिलांचे अज्ञान च आपल्या पोटच्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहे.अशी चर्चा ही होत असून आणखी असे किती भोंदूबाबा माण मध्ये आहेत याचा तपास ही होणे गरजेचे आहे.

     दरम्यान दोन देवऋष्यांच्या भूत लागल्याच्या सल्ल्याने, 

१४ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला असून

जादूटोणा विरोधी कायद्यान्वये सखोल चौकशीची अंनिसने मागणी केली आहे.



    दहिवडी ता माण जिल्हा सातारा येथील “बायली सुभाष इंगवले” या १४ वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू दि. २० फेब्रु. २०२१ रोजी, रात्री ११. ५५ वा. झाला, आणि अत्यंत गुप्तपणे तिचा मृतदेह त्याच रात्री पालकांनी दहिवडी च्या नदी काठी पुरला. ही धक्कादायक घटना घडली 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दहिवडी येथील १४ वर्षाच्या बायली इंगवले, हिचे सतत डोके दुखत होते. तसेच तापही आला होता. स्थानिक डॉक्टरांनी प्रथमोपचार करून घरी पाठवले. परंतु कुटुंबियांनी तिला दुपारी गोंदवले येथील ऊत्तम अवघडे या देवऋष्याकडे घेवून गेले. “देवऋषी याने तुमच्या घराच्या आसपास बारव आहे,  तेथील भूत मुलीला लागले आहे. अमावास्येपर्यंत ठीक होईल असे सांगितले व मंत्रतंत्र करून परत पाठवले.” नंतर संध्याकाळी जास्त त्रास झाल्याने “रामचंद्र सावंत या मोही या गावच्या देवऋषी कडे मुलीला नेण्यात आले. याही  देवऋषीने  बारवीतले भूत लागले आहे. व पौर्णिमेपर्यंत देव बांधलेले आहेत. आणि ते ठीक होणे खूप कठीण आहे. २० तारखेच्या रात्री १२वाजेपर्यंत तिला भयंकर धोका आहे, असे सांगून मंत्रतंत्र व अंगारे –धुपारे करून परत पाठवले .” 

“त्या रात्री घरातील सर्व जण मुलीला गराडा घालून काय होतेय हे केवळ बघत बसले, मुलगी शांत बसली होती. तिचे हात पाय थरथर कापत होते, पण तरीही सगळ्यांच्या नजरा घड्याळाच्या काट्याकडे १२ वाजण्याची वाट बघत बसले , यातच बाराला ५  मिनिटे कमी असताना ती मुलगी निपचित पडली निधन पावली.” या घटनेमुळे देवऋष्याने सांगितल्याप्रमाणे खरोखरच तिला भूताने नेले ही बाब देवऋषीवरील विश्वास दृढ होण्यास कारणीभूत ठरली. कुटुंबीयांनीच काहीही बोभाटा न करता मुलीचा मृतदेह जवळच असलेल्या नदीकाठी  पुरला. 



  ही घटना, सातारचे जिज्ञासा ग्रुपचे सदस्य निलेश पंडित यांना आंधळी गावचे समाजसेवक अशोक शेंडे व  सुनील काटकर यांनी सांगितली त्यांनी सातारा अंनिसचा संपर्क सुनील काटकर यांना दिला, फोनवर ही हकीकत प्रशांत पोतदार यांना कळाली, लगेच कार्यकर्त्यांनी दहिवडी गाठले.  सातारा येथील अंनिस चे कार्यकर्ते  प्रशांत पोतदार, अॅड. हौसेराव धुमाळ, सीताराम चाळके  व आंधळी गावचे समाजसेवक अशोक  शेंडे हे सर्वजण मृत मुलीच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटण्यास जाऊनही कुटुंबीयांनी भेट नाकारली.  परंतु यामागील सत्यशोधन होऊन आपले कृत्य जनतेपुढे येईल व समाजात आपली नाचक्की होईल, या भीतीने तसेच,  देवऋषीच्या दहशतीमुळे मुलीच्या कुटुंबीयांनी आम्हाला भेटण्यास नकार दिला. आमची कोणतीही तक्रार नाही, असे कुटुंबियांकडून मध्यस्ती सुनील काटकर यांना निरोप देण्यात आला. काटकर यांच्या घरी मुलीचे मामा जे पोलीस दलात कार्यरत आहेत व गावातील काही तरुण यांच्याशी आम्ही चर्चा केली. घडलेला सर्व प्रकार हा जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे .

कुटुंबातील कोणीही तक्रार दिल्यास दोषी देवऋषी लोकांना अटक करता येईल व यापुढे अशा घटना टळतील. मुलीच्या मामाने तरी तक्रार द्यावी अशी विनंती आम्ही केली, मात्र त्यांनीही तक्रार देण्याचे  नंतर नाकारले . हे अत्यंत वेदनादायी आहे. 

या संपूर्ण प्रकरणाची दखल जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत सबंधित पोलीस स्टेशन च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दक्षता अधिकारी या तरतुदीनुसार असलेल्या या “सू मोटो” अधिकारातून त्यांनी करावी, व मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोन्ही देवऋषी यांची तसेच परस्पर मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या दोषींची सखोल चौकशी करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा जिल्हा यांनी मा. जिल्हाधिकारी सातारा , मा. पोलीस अधीक्षक सातारा , मा. सिव्हील सर्जन सातारा यांच्याकडे केली आहे.
    दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर 
 डीवायएसपी डॉक्टर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजकुमार भुजबळ ,पीएसआय प्रमोद दीक्षित, पीएसआय तुपे, पोलीस हवलदार प्रकाश हांगे , पोलीस नाईक रवींद्र  बनसोडे, पोलीस हवलदार संजय केंगले, पोलीस शिपाई प्रमोद कदम, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी वडूज यांचे पथकातील कर्मचारी यांनी दोन्ही भोंदू बाबांच्या घरी जाऊन त्यांना अटक केली आहे.

   या घटनेने   सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या