कोल्हापूर-पुणे नवीन अतिजलद रेल्वे मार्ग व कोल्हापूर-वैभववाडी या प्रस्तावित रेल्वे मार्गासंदर्भात आज मंत्रालयामध्ये बैठक संपन्न..

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 19/01/2021 11:17 PM

कोल्हापूर-पुणे नवीन अतिजलद रेल्वे मार्ग व कोल्हापूर-वैभववाडी या प्रस्तावित रेल्वे मार्गासंदर्भात आज मंत्रालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, या संदर्भातील प्राथमिक अहवाल येत्या पंधरा दिवसात सादर करण्याच्या सूचना महारेलच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर,सातारा जिल्ह्यांचे औद्योगिक महत्व लक्षात घेऊन 'पुणे-कोल्हापूर' हा नवीन सरळ अतिजलद रेल्वेमार्ग वेळेची बचत व उद्योगाला चालना देण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. सध्याच्या वळणावळणाच्या रेल्वे मार्गामुळे पुण्याहून कोल्हापूरला जाण्यासाठी सात तास लागतात व ते अंतर ३४० किलोमीटर होते. 

तसेच, रस्त्याने गेल्यास साडेचार तास लागतात आणि ते अंतर २३० किलोमीटर होते.  कोल्हापूर, सातारा, कराड या भागातून दररोज सुमारे २५ लाख लिटर दूध व २०० ट्रकहून अधिक भाजीपाला पुणे व मुंबईसाठी रवाना होतो.

कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात अनेक साखर कारखाने असून मोठ्या प्रमाणात साखरेचे  उत्पादन होते. या नवीन रेल्वेमार्गामुळे वाहतुकीचा खर्चही वाचणार असून अडचणीत असणाऱ्या साखर कारखान्यांना त्याचा उपयोग होईल.

तसेच, कोल्हापूर जिल्हा व परिसरातील आयटी क्षेत्रामधील सुमारे १० हजार कर्मचारी पुणे-मुंबई येथे कामानिमीत्त प्रवास करत असतात. वरील सर्व मुद्दे लक्षात घेता पुणे ते कोल्हापूर हा सरळ नवीन अतिजलद रेल्वेमार्ग झाल्यास कोल्हापूर, सातारा व कराड या परिसरातील शेती, उद्योगाला चालना मिळण्याबरोबरच प्रवाशांचा वेळ, श्रम आणि पैसाही वाचणार आहे.

तसेच, कोल्हापूर- वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्गासंदर्भातही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मंडळाने या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालही सादर केला असून त्या बाबतचीही पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे.

- ना. सतेज (बंटी) डी. पाटील 
    पालकमंत्री, कोल्हापूर

Share

Other News

ताज्या बातम्या