32 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची मोठ्या उत्साहात जिल्ह्यात सुरुवात

  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 19/01/2021 7:48 AM


सुरक्षित  रस्ता प्रवासासाठी प्राथमिक शाळेपासूनच जनजागृती व्हायला पाहिजे - कपिल पाटील

32 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची मोठ्या उत्साहात जिल्ह्यात सुरुवात

ठाणे  : सुरक्षित प्रवासासाठी प्राथमिक शाळेपासून जनजागृतीला सुरुवात केल्यास पुढे अच्छे दिन येऊन भविष्यात सुरक्षा सप्ताह साजरा करण्याची वेळ येणार नाही असे प्रतिपादन भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्र शासनाच्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्री.कपिल पाटील यांनी केले प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन प्रसंगी  ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी   राजेश नार्वेकर, ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे  प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यां श्रीमती परदेशी आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. कपिल पाटील म्हणाले, आजच्या डिजिटल युगात जीवन हे गतिमान झालं आहे. पण ही गतिमानता रस्त्यावर दिसता कामा नये म्हणून   चळवळ उभारुन सुरक्षित रस्ता प्रवासासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे.

            जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी राज्यातील प्रमुख महामार्ग ठाणे जिल्ह्यातून जाणार आहेत. त्यामुळे भविष्यातील वाढणाऱ्या वाहतुकीचा विचार करून आताच नियोजन करायला पाहिजे. याशिवाय कोरोना काळात ज्याप्रमाणे मास्क घालणे अनिवार्य झाले तसेच हेल्मेट घालण्याची सवय लावून घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी वाहन चालकांच्या डोळ्यांबाबत मुद्दा उपस्थित करत वाहन चालकांच्या दृष्टी क्षमतेचे परीक्षण होणे महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यासाठी लागणारे सहकार्य जिल्हा रुग्णालयामार्फत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

            ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध माहिती देणाऱ्या रस्ता सुरक्षा चित्ररथाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्रादेशिक अधिकारी विश्वभंर शिंदे यांनी केले. यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे इतर अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या