खासदार पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर
खासदार अशोक नेते यांच्या प्रशासनास सूचना
खास. अशोक नेते यांनी केली कुनघाडा- मालेरचक परिसरातील नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी
गडचिरोली:- दि . 30/10
जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र तालुका प्रशासनाकडून अजूनही सर्व्हेक्षण करण्यास सुरुवात न झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेणार कोण असा सवाल शेतकरी बांधवाकडून उपस्थित केला जात आहे. या परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी 30 ऑक्टोबर रोजी कुनघाडा जिप क्षेत्राचा दौरा केला व येथील नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी केली. मालेरचक, कुनघाडा, जोगना परिसरात शेतीच्या बांधावर जाऊन पाहिले असता धानपिक पूर्णतः पाऊस व वादळी वाऱ्याने खाली पडलेले असून हातात येणारे उभे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले त्यामुळे शेतकऱ्यांनी मेहनत व पैसे खर्च करून पेरणी केलेले पीक अर्धेअधिक नष्ट झाले असून 50 टक्केही उत्पादन हातात येणार नसल्याचे काही शेतकऱ्यांनी खासदार अशोक नेते यांच्या समक्ष बोलून दाखविले.
खासदार अशोक नेते यांच्या नुकसान ग्रस्त भागाच्या दौरा दरम्यान जिप चे कृषी सभापती रमेश बारसागडे, भाजपचे आदिवासी आघाडी चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, ओबीसी मोर्चा चे जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, गडचिरोली चे उपजिल्हाधिकारी तथा चामोर्शीचे तहसीलदार अवतरे, व कृषी विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी शेतकऱ्यांची अडचण व प्रत्यक्ष पीक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व नुकसानग्रस्तांच्या शेतीचे तात्काळ सर्व्हेक्षण करून तसा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश तालुका प्रशासनास दिले व पीकविमा साठी उद्भवलेल्या सर्व अडचणी दूर करून सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले. व सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी संदर्भात कागदपत्रांची पूर्तता करून पीक विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. व शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या संदर्भात कृषी विभाग, तलाठी, ग्रामसेवक किंवा तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हयगय करीत असल्यास किंवा टाळाटाळ करून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिल्यास खपवून घेणार नसल्याचा गर्भित इशाराही यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिला.
निखील राखडे गडचिरोली जिल्हा मुख्य प्रतिनिधी
7774807014