मुंबई – जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतातील मुंबई आणि दिल्लीतही अशा लाटेची शक्यता आहे. याचा परिणाम थेट आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातील पैसे काढून सोने आणि चांदीमध्ये गुंतवण्यास सुरुवात केली आहे. सलग दुसऱ्या सत्रात सोने दरात वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात सोने ४१८ रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५० हजार २८२ रुपयांवर बंद झाला. तत्पूर्वी सोने ५० हजार ८७० रुपयांपर्यंत वाढले होते. चांदीमध्ये देखील ७४८ रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६० हजार १७२ रुपयांवर बंद झाला.
डॉलरच्या मूल्यात सुधारणा व जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले. ते म्हणाले की सोने ०.५३ टक्क्यांनी घसरून १८६७.१ डॉलर प्रती औंसवर स्थिरावले. अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याकडे इतर चलन धारकांनी काहीसे दुर्लक्ष केले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने म्हटले की, कोरोना विषाणू मदत निधीबाबतचा करार नोव्हेंबर २०२० मधील अध्यक्षीय निवडणुकीनंतरच होईल.
अमेरिकेतील कामगार बाजारात मंदी असूनही अर्थव्यवस्था २०२० च्या तिस-या तिमाहीत चांगल्या गतीने सुधारत आहे. यावरून सरकराने मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहनपर मदत केल्याचे दिसून येते. त्यामुळेही पिवळ्या धातूच्या मागणीवर काहीसा नकारात्मक परिणाम झाला. अमेरिका, युरोप आणि जगातील अन्य महत्त्वाच्या भागात नव्याने कोरोनाची लाट आल्याने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान अनिश्चिततेचे वातावरण आहे. याचा परिणाम म्हणून सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणा-या सोन्याचे आकर्षण वाढून नुकसान काही प्रमाणात कमी झाले. अमेरिकेच्या अतिरिक्त मदतनिधीबाबतच्या अनिश्चिततेमुळे डॉलरला काहीसा आधार मिळाला. त्यामुळेही सोन्याचे दर आणखी कमी झाले. आजच्या सत्रात एमसीएक्सवर सोन्याचे दर घटण्याची शक्यता आहे.