अप्पर तहसिल सांगलीच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा उपलब्ध:-पालकमंत्री जयंत पाटील

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 31/10/2020 7:17 PM


 
 सांगली, दि. 31,
           मिरज तालुक्यात गावांची संख्या जास्त असल्यामुळे आणि सांगली शहराच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे अशी वेगवेगळ्या प्रकारे गावांची मांडणी असल्यामुळे सांगली शहर व पश्चिम भागातील गावांसाठी अप्पर तहसिल कार्यालय सांगली सुरू करण्यात आले आहे. या अप्पर तहसिल कार्यालयांतर्गत 31 गावांचा समावेश करण्यात आला असून या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध होईल, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. 
 राजवाडा परिसर सांगली येथे अप्पर तहसिल सांगली कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर गीता सुतार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार मिरज डी. एस. कुंभार, अप्पर तहसिलदार सांगली डॉ. अर्चना पाटील, पृथ्वीराज पाटील तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी अप्पर तहसिल कार्यालय, सांगली मार्फत करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत तसेच मंजूर असलेल्या पदांबाबत सविस्तर माहिती घेतली. अप्पर तहसिल सांगली करिता अप्पर तहसिलदार १, नायब तहसिलदार १, अव्वल कारकून १, महसूल सहायक ४ अशी एकूण ७ पद आहेत.
 अप्पर तहसिल कार्यालयांतर्गत असलेल्या गावांचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत येणारे सर्व कामकाज सोमवार, दि. 2 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होणार आहे. अप्पर तहसिल सांगली कार्यालयांतर्गत सांगली मंडळातील गावभाग, संजयनगर, विश्रामबाग, अंकली, इनामधामणी, हरीपूर, बुधगाव मंडळातील बुधगाव, बिसुर, नांद्रे, वाजेगाव, का.खोतवाडी, नावरसवाडी, कुपवाड मंडळातील कुपवाड-1, कुपवाड-2, बामनोली, वानलेसवाडी, माधवनगर, कसबे डिग्रज मंडळातील कसबे डिग्रज-1, कसबे डिग्रज-2, सांगलीवाडी, मौजे डिग्रज, कर्नाळ, पद्माळे, तुंग, कवठेपिरान मंडळातील कवठेपिरान, शेरीकवठे, समडोळी, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी व मोळाकुंभोज अशा एकूण 31 गावांचा समावेश आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या