नारळी पौर्णिमा साधेपणाने साजरी ... दर्याला नारळ अर्पण करुन केली प्रार्थना

  • M.Samir Mahadkar (Mhasla )
  • Upadted: 03/08/2020 10:53 PM


नारळी पौर्णिमा हा कोळीवाड्यांतला महत्त्वाचा सण. दर्याला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण करायचा आणि वर्षभर भरपूर मासळी मिळावी, यासाठी प्रार्थना करायची. पारंपारिक गोडधोड पदार्थ. नाचगाण्यांचा जल्लोष आणि अनोख्या स्पर्धांचा माहोल…मात्र यंदा हे काहीच नव्हते. कोरोनाचे सावट असल्याने यंदाची नारळीपौर्णिमा केवळ दर्याला नारळ अर्पण करुन अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.

‘सन आयलाय गो…नारली पुनवेचा’ या कोळी गीतामध्ये कोळीबांधवांमध्ये या सणाबद्दल किती आनंद निर्माण झालेला असतो हे दिसून येते. जून व जुलै या दोन महिन्यांमध्ये जास्त पाऊस पडतो. तसेच समुद्र मोठ्या प्रमाणावर खवळलेला असतो. तसेच हा काळ मच्छीचा प्रजनन काळ असल्याने, शासनाकडून 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारीवर बंदी असते. 31 जुलैला मासेमारी बंदी संपत असली तरीसुद्धा कोळीबांधव नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करुन, नंतरच आपल्या होड्या मच्छिमारीसाठी समुद्रात ढकलतात.

रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ अर्पण करताना.

कोळीबांधव नारळ पौर्णिमेला बोटींची पूजा करतात. बोटींना पताका लावतात. छान रंगरंगोटी करून बोटी सजवतात आणि मासेमारीसाठी समुद्रात लोटतात. कोळीवाड्यातून मिरवणुका निघतात. थोरामोठ्यांपासून बच्चेकंपनीसह सगळे वाजत गाजत मिरवणुकीने बंदरावर येतात. पारंपरिक कोळीगीते आणि वाद्याच्या साथीने या मिरवणुका निघतात. समुद्राला शांत करण्यासाठी ‘सोन्याचा नारळ’ म्हणजेच नारळाला सोनेरी कागदाचे वेष्टन लावून सजवलेला नारळ विधिवत समुद्रात सोडला जातो.

…मात्र उत्साहाने भरलेला नारळी पौर्णिमेचा सण यंदा कोरोनामुळे शांत शांत होता. नारळफोडीच्या स्पर्धा नव्हत्या…की बोटींच्या शर्यती नव्हत्या… फक्त नारळाची विधीवत पूजा झाली आणि शांततेत तो समुद्राला अर्पण करुन प्रार्थना करण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या